मुंबई : आयपीएलच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी (आरसीबी) अत्यंत निराशाजनक ठरली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) झालेल्या या सामन्यात आरसीबीचा ९ गड्यांनी एकतर्फी धुव्वा उडाला. आधीच कर्णधार विराट कोहलीने यंदाचे सत्र कर्णधार म्हणून आपले अखेरचे सत्र असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याच्या खेळीवर सर्वांचे लक्ष होते. मात्र, कोहली केवळ ५ धावा काढून परतला आणि त्यानंतर आरसीबीचा अवघ्या ९२ धावांत खुर्दा उडाला. पण या सामन्यानंतर सर्वांचे लक्ष वेधले ते बॉलिवूड क्वीन दीपिका पदुकोन हिने. या सामन्याच्या निमित्ताने तिचे तब्बल ११ वर्षे जुने ट्वीट व्हायरल झाले आणि नेटिझन्सनी आरसीबीची जबरदस्त मजा घेतली.
माफक धावसंख्येचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या केकेआरला शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी ९ हून अधिकच्या धावगतीने सुरुवात करून दिली. केकेआरने ६ षटकांतच बिनबाद ५६ धावा करत विजयाचा पाया मजबूत केला. गिलने (४८) व अय्यरने (४१*) धावा करत कोलकाताला विजयी केले. युझवेंद्र चहलने गिलच्या रुपाने एक बळी मिळवला. त्याआधी, आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. जिथे किमान १५० धावांची गरज होती, तिथे आरसीबीला शंभरीही पार करता आली नाही. येथेच त्यांनी सामना गमावला. या शानदार विजयासह कोलकाताकडे प्ले ऑफची संधी निर्माण झाली असून आता गुणतालिकेतही मोठा परिणाम होईल.
यानंतर व्हायरल झाले ते दीपिकाचे जुने ट्वीट. या ट्वीटमध्ये दीपिकाने म्हटले आहे की, ‘९२ हा पण काही स्कोअर असतो का?’ बस्स मग काय? नेटिझन्स लागले आरसीबीची खेचायला. यावरुन अनेकांनी मीम्सचा मारा करत आरसीबीला जेरीस आणले.
खरं म्हणजे २०१० सालच्या सत्रात आरसीबीने जबरदस्त कामगिरी करताना राजस्थान रॉयल्सचा डाव ९२ धावांमध्ये संपुष्टात आणला होता. त्यावेळी दीपिकाने हे ट्वीट केले होते की, ‘९२ धावांचा स्कोअर पण स्कोअर असतो का?’ पण आता आरसीबीचाच ९२ धावांत खुर्दा उडाल्यानंतर काही ‘तल्लख’ नेटिझन्सनी दीपिकाचे हे जुने ट्वीट पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणत आरसीबीची जिरवली आहे.