IPL 2021, Kolkata Knight Ridersvs Rajasthan Royals Live Updates : ना मुंबई इंडियन्सला, ना पंजाब किंग्सला कोणालाच संधी द्यायची नाही, असा निर्धार करूनच कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) मैदानावर उतरले. शारजाच्या मैदानावर KKRच्या शुबमन गिल व वेंकटेश अय्यर यांनी तुफान फटकेबाजी केली. ही जोडी अधिक काळ खेळपट्टीवर टिकली असती तर राजस्थान रॉयल्ससमोर आणखी तगडं आव्हान उभं राहिलं असतं. अय्यर व गिल हे दोघंही बाद झाल्यानंतर KKR कडून दुसऱ्या कुठल्या फलंदाजाकडून मोठी खेळी झाली नाही. तरीही त्यांनी RRसमोर आव्हानात्मक धावा उभ्या केल्या आहेत.
१३ सामन्यांत १२ गुण खात्यात असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) इतरांना प्ले ऑफची संधी द्यायचीच नाही, हा पण करूनच मैदानात उतरले. वेंकटेश अय्यर व शुबमन गिल यांनी वादळी सुरुवात केली. मागील सामन्यात अर्धशतक झळकावल्यामुळे गिलचा आत्मविश्वास परत आलेला जाणवला. अय्यर तुफान फॉर्मात होताच आणि आज त्यानं राजस्थानच्या ( RR) गोलंदाजांची चांगली धुलाई केली. राहुल टेवाटियानं ११व्या षटकात ही जोडी तोडली. राहुलच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप मारण्याचा वेंकटेशचा प्रयत्न फसला अन् तो ( ३८) त्रिफळाचीत झाला. त्यानंतर आलेल्या नितिश राणानं त्याच्या पहिल्याच षटकात ग्लेन फिलिप्सला धुतले, परंतु त्याच षटकात त्याची विकेटही पडली.
दोन विकेट लागोपाठ पडल्यानंतर KKRचा खेळ मंदावेल असे वाटत होते, पण गिल चांगलाच दाणपट्टा चालवत होता. त्यात कर्णधार संजू सॅमसनकडून राहुल त्रिपाठीचा झेल सुटला. गिलनं ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. गिल ४४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५६ धावांवर माघारी परतला. ख्रिस मॉरिसनं ही महत्त्वाची विकेट घेतली. राहुल त्रिपाठी १४ चेंडूंत २१ धावा करून चेतन सकारियाच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. इयॉन मॉर्गन स्वतःला प्रमोशन देताना फलंदाजीला आला, पण त्याला चेंडू इतक्याच धावा करता आल्या. RRच्या गोलंदाजांनी डेथ ओव्हर्स चांगल्या फेकल्या. मॉर्गन १३ व कार्तिक ११ धावांवर नाबाद राहिले आणि कोलकातानं ४ बाद १७१ धावा केल्या. शारजात ही यंदाच्या पर्वातील सर्वोत्तम धावसंख्या ठरली.