IPL 2021, KL Rahul: दुबईच्या मैदानात सुरू असलेल्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं विजयासाठी १८६ धावांचं आव्हान दिलं आहे. राजस्थानच्या युवा क्रिकेटपटूंनी दमदार फलंदाजी केली. पण कर्णधार संजू सॅमसन मात्र स्वस्तात बाद झाला आणि त्याला करण ठरलं ते म्हणजे पंजाबचा कर्णधार केएल राहुल यानं यष्टीमागे टिपलेला अफलातून झेल.
सामन्याच्या आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसन यानं ऑफ साइडच्या दिशेनं फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू सॅमसनच्या बॅटची कडा घेत यष्टीरक्षक केएल राहुलच्या दिशेनं गेला. चेंडू उंचावर असल्यानं झेल टिपण तसं कठीण होतं. पण केएल राहुल यानं समयसूचकता दाखवत सुपरमॅन सारखी उडी घेत एका हातानं झेल टिपला आणि सॅमसनला माघारी धाडलं. सॅमसनच्या विकेटमुळे इशान पोरल याचं आयपीएलमधलं खातंही उघडलं.
राजस्थानचं पंजाबसमोर १८६ धावांचं आव्हान
पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं १८६ धावांचा डोंगर उभारला आहे. सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या पंजाबच्या गोलंदाजांचा राजस्थानच्या सलामीवीरांनी जोरदार समाचार घेत जबरदस्त सुरुवात करुन दिली. राजस्थानचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल यानं आपल्या नजाकती फटक्यांचा नजराणा पेश करत पंजाबच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. तर राजस्थानकडून संधी मिळालेल्या अॅलन लुईसनंही संधीचं सोनं केलं.
यशस्वी जयस्वालनं ३६ चेंडूत ४९ धावांची खेळी साकारली. यात २ खणखणीत षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे. तर लुईसनं २१ चेंडूत ३६ धावांचं योगदान दिलं. दोघांनी सलामीसाठी ५४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन (४) यावेळी चांगली कामगिरी करू शकला नाही. यष्टीरक्षक केएल राहुलनं सॅमसनचा सुंदर झेल टिपला आणि त्याला माघारी धाडलं. टी-२० प्रकारात सध्या तुफान फॉर्मात असलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनही १७ चेंडूत २५ धावांचं योगदान दिलं. सामन्याच्या १२ व्या षटकात अर्शदिपच्या गोलंदाजीवर सीमारेषेजवळ पंजाबच्या अॅलन फॅबियननं लिव्हिंगस्टोनचा सुंदर झेल टिपला.