- अयाज मेमन
चेन्नई : आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजांनी मोक्याच्या वेळी करून दिलेल्या पुनरागमनाच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने यंदाच्या आयपीएलमध्ये विजयी सलामी देताना सनरायझर्स हैदराबादचे आव्हान १० धावांनी परतावले. कोलकाताने दिलेल्या १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ ५ बाद १७७ धावांचीच मजल मारू शकला.
चेपॉक स्टेडियमवर नाणेफेक जिंकून हैदराबादने गोलंदाजीचा अपेक्षित निर्णय घेतला. सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजीस प्राधान्य दिले. धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या प्रमुख फलंदाजांवर मोठी जबाबदारी होती. कारण त्यांची फलंदाजी खोलवर नाही. त्यातच रिद्धिमान साहा, कर्णधार डेव्हिड वॉर्नर हे अपयशी ठरले. मात्र, जॉनी बेयरस्टो आणि मनीष पांड्ये यांनी ९२ धावांची आक्रमक भागीदारी करत हैदराबादच्या आशा कायम ठेवल्या होत्या. प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर विजय आवाक्यात आणण्याची हैदराबादची कामगिरी कौतुकास्पद ठरली. बेयरस्टोने ४० चेंडूंत ५५, तर मनीषने ४४ चेंडूंत नाबाद ६१ धावांचा तडाखा दिला. मात्र दोघांची झुंज अखेर अपयशी ठरली. १३व्या षटकात पॅट कमिन्सने बेयरस्टोला बाद करत सामना कोलकाताच्या बाजूने फिरवण्यास मोलाची भूमिका बजावली.
त्याआधी नितिश राणा आणि राहुल त्रिपाठी यांच्या चौफेर फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सलामीवीर शुभमान गिल चांगल्या सुरुवातीनंतर झटपट बाद झाल्यानंतर राणा-राहुल यांनी ४४ चेंडूंत ९३ धावांची वेगवान भागीदारी केली. यामुळे कोलकाताची दोनशेच्या दिशेने भक्कम वाटचाल सुरू होती. मात्र, मोहम्मद नबी व राशिद खान या अफगाणिस्तानच्या द्वयीमुळे हैदराबादला पुनरागमन करता आले.
राणाने कोलकाताच्या प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवताना त्यांची लय बिघडवली. त्याने ९ चौकार व ४ षटकारांचा तडाखा देत आपली खेळी सजवली. राहुलने ५ चौकार व २ षटकार मारले. राहुलने तब्बल १८२.७५ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने, तर राणाने १४२.८५ स्ट्राइक रेटने फटकेबाजी केली. राहुल आणि त्यानंतर अष्टपैलू आंद्रे रसेल काही चेंडूंच्या फरकाने बाद झाल्याने कोलकाताच्या धावगतीला ब्रेक लागला.
१८व्या षटकात मोहम्मद नाबीने राणा आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत हैदराबादला पुनरागमन करून दिले. राशिदने शुभमान व रसेल असे दोन महत्त्वाचे बळी मिळवले. त्याचवेळी भुवनेवर कुमार, टी. नटराजन, संदीप शर्मा आणि विजय शंकर हे गोलंदाज महागडे ठरले.
राणाची दणकेबाजी खेळी
नितिश राणाने पॉवर प्लेचा मोठा फायदा घेताना हैदराबादची गोलंदाजी अक्षरश: फोडून काढली. त्याने शुभमान गिलसह ५३ धावांची सलामीही दिली आणि यामध्ये राणाने ३६ धावा चोपल्या होत्या. राणाने यावेळी एका अनोख्या विक्रमाला गवसणीही घातली. त्याने पहिल्या ते पाचव्या क्रमांकावर खेळताना अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. याआधी आयपीएलमध्ये अशी कामगिरी रोहित शर्मा आणि शेन वॉटसन यांनीच केली होती. यामध्ये आता नितिश राणानेही स्थान मिळवले आहे.
६९९ दिवसांनंतर हरभजन मैदानात
- ४० वर्षीय हरभजन सिंगचे केकेआरकडून पदार्पण.
- २०१९ साली आयपीएलचा अंतिम सामना खेळल्यानंतर ६९९ दिवसांनी हरभजनने पहिला व्यावसायिक सामना खेळला.
- गेल्या सहा आयपीएल डावातील नितीश राणाचे तिसरे अर्धशतक
Web Title: IPL 2021: Kolkata's winning opener; Manish Pandye, Bairstow's failed fight
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.