रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या ( RCB) एबी डिव्हिलियर्सनं ( AB de Villiers) मंगळवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर वादळी खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एबीनं ४२ चेंडूंत नाबाद ७५ धावा चोपल्या आणि या सामन्यात त्यानं आयपीएलमधील ५००० धावांचा पल्लाही ओलांडला. एबीच्या या फटकेबाजीनंतर भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाचे कौतुक केले.
''ही अविश्वसनीय खेळी आहे. एखाद्या जादूसारखी. या माणसानं आपल्याला भरभरून आनंद दिला आहे. त्याची फटकेबाजी पाहताना अनेकदा आपला जबडा खुलाच्या खुला राहतो,''असे गावस्कर म्हणाले. गावस्कर पुढे म्हणाले एबीला पूर्ण २० षटकं खेळताना पाहायला आवडेल. ''एबीची फटकेबाजी पाहतच रहावी, अशी आहे. १०व्या किंवा ११व्या षटकात पाठवण्यापेक्षा त्याला सलामीला का पाठवत नाही?; एबीडीचे २० षटकं पाहायची आहेत,''असे गावस्कर पुढे म्हणाले.
एका धावेन जिंकला सामना...एबीनं २०व्या षटकात २३ धावा कुटल्या. तो ४२ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. RCBनं ५ बाद १७१ धावा केल्या. दिल्लीला अखेरच्या षटकात १४ धावांची गरज होती. हर्षल पटेलनं ३७ धावांत २ विकेट्स घेतल्या. आता सर्व मदार मोहम्मद सिराजच्या खांद्यावर होती. सिराजनं पहिल्या तीन चेंडूंत फक्त दोनच धावा दिल्या. चौथ्या चेंडूवर दोन धावा आल्या अन् रिषभनं अर्धशतक पूर्ण केलं. पाचव्या चेंडूवर नशीबानं दिल्लीला एक चौकार मिळाला अन् अखेरच्या चेंडूवर सहा धावांची गरज होती. पण, रिषभला चौकार मारता आला. शिमरोन २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावांवर नाबाद राहिला. रिषभ ४८ चेंडूंत ५८ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीनं १ धावेनं सामना गमावला. त्यांना ४ बाद १७० धावांवर समाधान मानावे लागले.