IPL 2021: मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) फिटनेसबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बराच काळ तो गोलंदाजीपासून दूर आहे. भारतीय संघाकडून खेळतानाही त्यानं गोलंदाजी केली नव्हती. आता मुंबई इंडियन्सकडून खेळतानाही हार्दिक गोलंदाजी करताना दिसत नाहीय. त्यामुळे अगदी दोन आठवड्यांच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघासमोर हार्दिकच्या फिटनेसबाबतचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
ट्वेन्टी-२० मध्ये सामना एकहाती खेचून आणण्याची क्षमता हार्दिक पंड्यामध्ये आहे. त्यामुळे फिटनेसबाबत साशंकता असतानाही त्याची ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात त्याची निवड झाली आहे. वर्ल्डकपपर्यंत हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट होईल अशी आशा बाळगली जात होती. पण सध्याची परिस्थीती पाहता हार्दिक गोलंदाजी करू शकेल का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
हार्दिक पंड्याच्या गोलंदाजी न करण्यामागचं कारण मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी स्पष्ट केलं आहे. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीसाठी आम्हाला कोणतीही घाई करायची नाही कारण असं केलं तर त्याचा त्यालाच त्रास होऊ शकतो आणि आगामी ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेवर याचा परिणाम होऊ शकतो, असं जयवर्धने यांनी म्हटलं आहे.
"हार्दिकला गोलंदाजी करू दिली तर त्याच्या फलंदाजीवर याचा परिणाम होऊ शकतो. सध्या तो एक फलंदाज म्हणून खूप उपयोगी खेळाडू आहे. त्यानं गेल्या बऱ्याच काळापासून गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे त्याच्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न आम्ही घेत आहोत. भारतीय संघ व्यवस्थापन देखील हार्दिकसोबत संपर्कात आहे. तो आयपीएलमध्ये गोलंदाजी करू शकेल की नाही याबाबत आम्ही दैनंदिन पातळीवर लक्ष ठेवून आहोत. सध्याच्या परिस्थितीनुसार जर आम्हीला त्याला गोलंदाजी करू दिली तर त्याचा त्रास होऊ शकतो आणि याचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम होईल. एक उत्तम फलंदाज म्हणून मग तो संघासाठी उपयोगी ठरणार नाही याची भीती आम्हाला आहे", असं जयवर्धने म्हणाला.
श्रीलंका दौऱ्यात केली होती गोलंदाजी
हार्दिक पंड्यानं श्रीलंका दौऱ्यात गोलंदाजी केली होती. यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत तिनही सामन्यांमध्ये हार्दिक गोलंदाजी करताना पाहायला मिळाला होता. यात पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात त्यानं प्रत्येकी एक विकेट घेतली होती. याशिवाय तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेतही पहिल्या सामन्यात हार्दिकनं गोलंदाजी केली होती. या सामन्यातही त्यानं एक बळी घेतला होता. श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर हार्दिकची निवड ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात झाली. यावेळी निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी पंड्या गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे फिट असल्याचं म्हटलं होतं.
Web Title: ipl 2021 Mahela jayawardene says they are not forcing hardik pandya to bowl as it might hamper his batting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.