दुबई : यंदाच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केलेले दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ सोमवारी एकमेकांविरुद्ध लढतील. बाद फेरी निश्चित असली तरी गुणतालिकेत अव्वल स्थानी कोणता संघ हक्क गाजवणार हे या सामन्यातून ठरेल. सध्या दोन्ही संघांचे प्रत्येकी १८ गुण असून, चेन्नई अव्वल स्थानी, तर दिल्ली दुसऱ्या स्थानी आहे.
चेन्नईचे अव्वल स्थान याआधीच भक्कम झाले असते. मात्र, त्यांना गेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सच्या तुफानी फटकेबाजीपुढे हार पत्करावी लागली होती. दुसरीकडे, दिल्लीकरांनी मात्र अटीतटीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे सोमवारी मानसिकरीत्या दिल्लीचा संघ अधिक सकारात्मक असेल. या दोन्ही संघांनी आतापर्यंत आपला दबदबा राखला असून, सोमवारी कोणता संघ बाजी मारणार, याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.
चेन्नईला गोलंदाजीत अधिक सुधारणा करावी लागेल. ऋतुराज गायकवाडच्या दमदार शतकानंतर १८९ धावा उभारल्यानंतरही त्यांना राजस्थानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे जोश हेजलवूड, दीपक चहर, ड्वेन ब्रावो, शार्दूल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांना अधिक चांगला मारा करावा लागेल. फलंदाजीत चेन्नई संघ सुस्थितीत आहे. गायकवाडसह फाफ डुप्लेसिस, अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांनी चांगली कामगिरी केली आहे. शिवाय कर्णधार महेंद्रसिंग धोनीही आपल्या जुन्या स्टाइलने खेळत असल्याने डेथ ओव्हर्समध्ये दिल्लीला त्याची फटकेबाजी महागडी ठरू शकते.
दुसरीकडे, दिल्लीचा संघ यंदाचा संभाव्य विजेता म्हणून मानला जातोय. फलंदाजी आणि गोलंदाजीत अत्यंत समतोल असलेला हा संघ यंदा सातत्यपूर्ण खेळ करीत आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाल्यानंतर शानदार पुनरागमन करीत दिल्लीने मुंबईला अखेरच्या षटकात नमविले होते. श्रेयस अय्यरने केलेली जबाबदारीपूर्वक फलंदाजी दिल्लीसाठी जमेची बाजू ठरली. कर्णधार ऋषभ पंतही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ यांची बॅट तळपली, तर चेन्नईला सलग दुसरा पराभव पत्करावा लागू शकतो. गोलंदाजीत कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्खिया, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांच्यापुढे चेन्नईच्या फलंदाजांचा कस लागेल.