IPL 2021 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या ऑक्शनची सर्व तयारी झाली आहे... १० फ्रँचायझींनी आपापला अभ्यास करून ५९० खेळाडूंपैकी कोणावर किती बोली लावायची याचे डावपेच आखले आहेत. अहमदाबाद व लखनौ या दोन नवीन फ्रँचायझींच्या आगमनामुळे आधीच्या ८ संघांना त्यांची जमलेली घडी विस्कळीत करावी लागली. इच्छा नसताना ताफ्यातील खेळाडू रिलीज करावे लागले. आता ऑक्शनमध्ये रिलीज केलेल्या अनेक मोठ्या खेळाडूंना आपल्याकडे वळते करण्यासाठी तगडी बोली लावण्याची तयारी सर्वांनी केली आहे. पण, BCCIने अखेरच्या मिनिटाला फ्रँचायझींसमोर बाऊन्सर फेकला आहे.
आयपीएल २०२२ ऑक्शनला दोन दिवस शिल्लक असताना BCCIने मोठी घोषणा केली. इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएल २०२२च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याचे BCCIने जाहीर केले. २७ मार्चपासून आयपीएल २०२२ला सुरुवात होणार आहे आणि क्वारंटाईन नियमांमुळे या खेळाडूंना सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागणार आहे.कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, क्विंटन डी कॉक, एनरिच नॉर्खिया, किरॉन पोलार्ड, जेसन होल्डर, जॉनी बेअरस्टो, मार्क वूड आदी खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहेत. माजी विजेत्या मुंबई इंडियन्सना आता पोलार्डशिवाय पहिल्या काही सामन्यांत खेळावे लागेल.
- इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात १२ मार्चपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे आणि ती २८ मार्चला संपणार आहे.
- इंग्लंडचे खेळाडू सुरुवातीचे काही सामने वगळल्यास संपूर्ण आयपीएल खेळणार आहेत.
- दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात तीन वन डे व २ कसोटी सामन्यांची मालिका १८ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत होणार आहे.
- परदेशी खेळाडूंना पाच दिवसांचा सक्तिचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे, जरी ते दुसऱ्या बायो बबलमधून आयपीएलच्या बायो बबलमध्ये येत असले तरी.
- बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन हा ८ ते २३ मे या कालावधीत होणाऱ्या कसोटी मालिकेमुळे आयपीएल २०२२च्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. जलदगती गोलंदाज मुस्ताफिजूर हा संपूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध आहे, तर लिटन दास, तस्कीन अहमद, शोरीफुल इस्लाम यांच्या आंतरराष्ट्रीय मालिकेसाठीच्या निवडीवर पुढील गणित अवलंबून आहे.
- ऑस्ट्रेलियच्या सर्व खेळाडूंना आयपीएल खेळण्याचे ना हरकत प्रमाणपत्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले आहे. पाकिस्तान दौऱ्यावरून ते थेट इथे येतील. पण, कसोटी संघातील सदस्य २५ मार्चनंतर दाखल होतील.
- श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू वनिंदू हसरंगा काही सामन्यांना मुकणार आहे. ११ ते २३ मे या कालावधीत श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.
Web Title: IPL 2021 Mega Auction : players from England, West Indies and South Africa are likely to miss a few games in IPL 2022, BCCI’s last-minute bouncer for franchises
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.