मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) शनिवारी इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2021) विक्रमी धावांचा पाठलाग केला. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर किरॉन पोलार्डच्या ( Kieron Pollard) वादळासमोर चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) पालापाचोळा झाला. CSKच्या 4 बाद 218 धावांच्या डोंगरासमोर MIचा टिकाव लागणार नाही, असेच वाटत होते. पण, पोलार्डचा दाणपट्टा चालला अन् मुंबईनं IPLमध्ये सर्वात मोठे लक्ष्य पार केले. पोलार्डनं 34 चेंडूंत 6 चौकार व 8 षटकारांसह नाबाद 87 धावा करताना MIचा विजय पक्का केला. पण, सामन्यानंतर पहाडाएवढा पोलार्ड भावूक झाला. आभाळाकडे हात जोडून उभा राहिला अन् वडिलांना नमन केलं. पोलार्डच्या या हळव्या रूपानं MIसह प्रत्येक क्रिकेट चाहत्याला इमोशनल केलं.
चेन्नईला पोलार्ड एकटा भिडला अन्...
फॅफ ड्यू प्लेसिस ( 50), मोईन अली ( 58) व अंबाती रायुडू ( 72) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं 20 षटकांत 4 बाद 218 धावांचा डोंगर उभा केला. क्विंटन डी कॉक ( 38) व रोहित शर्मा ( 35) यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतरही मुंबई जिंकेल असे वाटत नव्हते. पण, कृणाल पांड्या व पोलार्ड यांनी दमदार भागीदारी केली. कृणाल 32 धावांवर बाद झाला, परंतु पोलार्डची फटकेबाजी सुरूच होती. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पोलार्डनं 34 चेंडूंत नाबाद 87 धावा केल्या. या विजयानंतर पोलार्डनं ही खेळी वडिलांना समर्पित केली. त्यानं आकाशाकडे पाहून हात जोडून वडिलांना नमन केलं.
आयपीएलपूर्वी वडिलांचे झाले निधन
आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी किरॉन पोलार्डवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि पोलार्डनं सोशल मीडियावर वडिलांसोबतच्या फोटोसह भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यानं लिहिलं होतं की,तुमच्या आत्म्याला शांती मिळो. तुमच्यावरील प्रेम सदैव कायम राहिल आणि तुम्हाला अभिमान वाटेल अशीच कामगिरी करत राहिन. तुम्ही आता चांगल्या ठिकाणी असाल, याची मला खात्री आहे.
मुंबई इंडियन्सनं अखेरच्या दहा षटकांत 138 धावा चोपल्या. आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना अखेरच्या दहा षटकांतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी 2019मध्ये MIनेच किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 133 धावा केल्या होत्या. टी-20 लीगमध्ये अखेरच्या 10 षटकांतील ही तिसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्रिनबागो नाईट रायडर्सनं 2018च्या CPLमध्ये सेंट ल्युसिया स्टारविरुद्ध 144 धावा केल्या होत्या.
Web Title: IPL 2021, MI beat CSK : Kieron Pollard dedicates match winning knock to his father who demised just before the ipl
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.