IPL 2021, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ( MI) आजचा खेळ बुचकळ्यात टाकणारा होता. प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या दिल्ली कॅपिटल्स ( DC) विरुद्धच्या सामन्यात MIच्या आघाडीच्या फळीनं मान टाकली. विशेषतः अक्षर पटेलच्या ( Axar Patel) फिरतीत ते अडकले. अक्षर व आवेश खान यांनी तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यांना दिल्लीच्या अन्य गोलंदाजांची उत्तम साथ मिळाली अन् मुंबईनं रडतखडत शतकी धावांची वेस ओलांडली.
अनुभवी रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा फ्युचर कर्णधार रिषभ पंत यांच्यातली चुरस पाहायला नक्की आवडेल. मुंबई व दिल्ली यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यात रोहितच्या टीमचे पारडे १६-१३ ( जय-पराजय) असे जड आहे. पण, दिल्लीचा संघ चांगल्या फॉर्मात आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉ दिल्लीच्या संघात परतला असून मुंबईनं राहुल चहरच्या जागी जयंत यादवला उतरवले आहे. मुंबईसाठी 'करो वा मरो', अशा या लढतीत रोहित शर्मा अपयशी ठरला. आवेश खानच्या शॉर्ट चेंडूवर पूल मारण्याच्या प्रयत्नात तो ७ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला.
सूर्यकुमार यादव व क्विंटन डी कॉक संयमी खेळ करत होते, दिल्लीच्या गोलंदाजांनी त्यांच्या धावांवर लगाम बसवली होती. पण, अक्षर पटेलनं ही जोडी तोडली. फॉर्मात असलेल्या क्विंटनला ( १९) त्यानं बाद करून मुंबईला दुसरा धक्का दिला. सूर्यकुमारला आज मोठी खेळी करून टीकाकारांची तोंड बंद करण्याची संधी होती. त्यानं काही सुरेख फटके मारून त्या दिशेनं सुरुवातही केली, परंतु अक्षरच्या फुल्टॉसवर तो रबाडाच्या हाती झेल देऊन परतला. त्यानं २६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह ३३ धावा केल्या. मागील सामन्यातील स्टार सौरभ तिवारीलाही अक्षरनं आज फेल केले. अक्षरच्या फिरकीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात सौरभनं ( १५) टोलावलेला चेंडू जागच्याजागी उडाला अन् रिषभ पंतनं सहज तो टिपला. पटेलनं ४ षटकांत २१ धावा देत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. १५व्या षटकात किरॉन पोलार्ड दुर्दैवीरित्या बाद झाला. अॅनरिच नॉर्ट्झेनं टाकलेल्या संथ चेंडूवर पोलार्डची बॅट आधीच फिरकी अन् चेंडू बॅटची किनार घेत यष्टींवर आदळला. मुंबईचा निम्मा संघ ८७ धावांवर माघारी परतला. नॉर्ट्झेचं ते षटक निर्धाव राहिले.