IPL 2021, MI vs DC T20 Match Highlight : प्रत्येक सामना अखेरच्या षटकापर्यंत नेऊन हुकूमी गोलंदाजांच्या जीवावर जिंकता येतो, हा फाजील आत्मविश्वास मुंबई इंडियन्सला नडला. विजयासाठी फलंदाजांनी धावाही करणे तितकेच गरजेचे असते, याचा विसर बहुदा MIच्या खेळाडूंना पडला. चुकीचे फटके मारून MIचे स्टार फलंदाज तंबूत परतले अन् दिल्ली कॅपिटल्ससमोर त्यांना १३८ धावांचे माफक लक्ष्यच ठेवता आले. शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, शिमरोन हेटमायर यांनी DCचा विजय पक्का केला. अमित मिश्रानं चार विकेट्स घेत हा सामना गाजवला.
IPL 2021, MI vs DC T20 Match Highlight :
- फिरकीला खेळपट्टीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी आपापल्या संघात बदल केले. मुंबईनं जयंत यादवला, तर दिल्लीनं अनुभवी अमित मिश्राला संधी दिली. रोहित शर्माविरुद्ध अमितची कामगिरी उजवी ठरल्याची आकडेवारी असल्यानं दिल्लीनं हा डाव खेळला.
- कागिसो रबाडा ऐवजी मार्कस स्टॉयनिसकडून पहिले षटक टाकून घेत रिषभ पंतन MIला संभ्रमात टाकले. तिसऱ्याच षटकात स्टॉयनिसनं त्यांना यशही मिळवून दिले. क्विंटन डी कॉक लगेच माघारी परतला. रोहित शर्मा व सूर्याकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरला.
- पार्ट टाईम गोलंदाज आवेश खान यानं रोहित-सूर्याची जोडी तोडली अन् तिथून मुंबईची घसरगुंडी सुरू झाली. अनुभवी अमितला ज्या कारणासाठी खेळवलं, त्यावर तो खरा उतरला. ९व्या षटकात त्यानं रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांना माघारी पाठवले. दोघंही चुकीचा फटका मारून स्टीव्ह स्मिथच्या हाती झेल देऊन माघारी परतले.
- कृणाल पांड्याला आज मोठी खेळी करण्याची संधी होती, परंतु अमितनं टाकलेला आत येणाऱ्या चेंडूवर लेट कट मारण्याची चूक करून बसला व त्याचा त्रिफळा उडाला. इशान किशन व जयंत यादव खेळपट्टीवर चिकटले, परंतु अमितनं पुन्हा ब्रेक लावला. त्यानं चार विकेट्स घेत मुंबईला ९ बाद १३७ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. किरॉन पोलर्डही अमितच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.
- दिल्लीच्या फिरकी गोलंदाजांनी केलेली कमाल मुंबईच्या फिरकीपटूंना करता आली नाही. दव फॅक्टरमुळे चेंडू सतत ओला होत होता आणि त्यामुळे गोलंदाजांनाही ग्रीप मिळण्यास मदत मिळत नव्हती. त्याचाही फटका मुंबईला बसला. जयंत यादवला दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉनं विकेट भेट दिली.
- स्टीव्ह स्मिथ व शिखर या अनुभवी फलंदाजांनी दिल्लीचा डाव सावरताना अर्धशतकी भागीदारी केली, परंतु त्यांचा धावांचा वेग कमीच होता. अखेरच्या सहा षटकांत दिल्लीला विजयासाठी ४८ धावांची गरज होती. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह व कृणाल पांड्या यांची प्रत्येकी दोन षटकं शिल्लक होती. राहुल चहरचेही एक षटक शिल्लक होते.
- १३व्या षटकानंतर चेंडू बदलला अन् सुका चेंडू अधिक टर्न होताना दिसला. राहुल चहरनं त्याच्या शेवटच्या षटकात शिखर धवनची विकेट घेत सामन्यातील चुरस वाढवली. धवन ४२ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४५ धावांवर माघारी परतला.
- १६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टनं DCचा फलंदाज ललित यादव याला धावबाद करण्याची संधी सोडली. रिषभ पंत स्ट्राईकवर असताना त्यानं बोल्टचा चेंडूवर प्लेस केला. तोपर्यंत ललित यादव खेळपट्टीच्या मधोमध आला होता. पण, नॉन स्ट्राईक एंडला बॅक अप खेळाडू नव्हता अन् बोल्टला डायरेक्ट हीट करता आला नाही.
- रिषभनं चुकीचा फकटा मारून पायावर धोंडा मारून घेतला. ट्रेंट बोल्टनं टाकलेल्या १८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ललित यादवसाठी पायचीतची अपील झाली, परंतु DRS घेऊनही MIला यश आलं नाही. बोल्टनं त्या षटकात ७ धावा दिल्या. त्यामुळे सामना १२ चेंडू १५ धाव असा चुरशीचा झाला.
- १९व्या षटकात जसप्रीतनं दोन नो बॉल फेकले. पण, त्यावर त्यानं दोनच धावा दिल्या. त्या षटकात १० धावा आल्यानं अखेरच्या षटकात पाच धावांची गरज होती आणि शिमरोन हेटमारयनं पहिल्या चेंडूवर चौकार खेचला अन् पोलार्डनं दुसरा चेंडू नो बॉल टाकून DCचा विजय पक्का केला.