IPL 2021, MI vs DC T20 : मुंबई इंडियन्सला फलंदाजांच्या अपयशामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना गमवावा लागला. अमित मिश्राची उत्तम गोलंदाजी व शिखर धवन, स्टीव्ह स्मिथच्या संयमी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह ६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. दुखापतीमुळे रोहित शर्मानं मैदान सोडल्यानंतर किरॉन पोलार्डनं MI चे नेतृत्व सांभाळले. मुंबईनं हा सामना गमावला असला तरी त्याच्या एका कृतीनं सर्वांची मन जिंकली. SPIRIT OF CRICKET
सामन्यात काय झालं?प्रथम फंलदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा ( ४४), सूर्यकुमार यादव ( २४), इशान किशन ( २६) व जयंत यादव ( २३) यांनी सुरेख खेळ केला. हार्दिक पांड्या व कृणाल पांड्या हे चुकीचे फटके मारून माघारी परतले. अमित मिश्रानं अनुभव पणाला लावताना मुंबईच्या फलंदाजांना नाचवले. त्यानं २४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. MIविरुद्ध DCच्या गोलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. आवेश खाननं २ षटकांत १५ धावांत २ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन ( ४५), स्टीव्ह स्मिथ ( ३३), ललित यावद ( २२*) आणि शिमरोन हेटमायर ( १४) यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. मुंबई इंडियन्सचे ९ बाद १३७ धावांचे आव्हान दिल्लीनं १९.१ षटकांत ४ बाद १३८ धावा करून सहज पार पाडले.
किरॉन पोलार्डनं शिखर धवनला दाखवली चूक अन्..आयपीएलमध्ये पुन्हा एकदा मांकडिंग चर्चेत आली आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली. CSKचा ड्वेन ब्राव्हो गोलंदाज चेंडू फेकण्याआधीच क्रिज सोडलेला दिसला. त्यामुळे गोलंदाजांना अशा फलंदाजांना मांकडिंग करण्याची मुभा मिळायला हवी अशी चर्चा सुरू झाली. असाच काहीसा प्रकार MI vs DC सामन्यात घडला.
१०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पोलार्ड गोलंदाजी करण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडपर्यंत आला, परंतु शिखर धवननं आधीच क्रिज सोडल्याचे त्याच्या लक्षात आले. यापूर्वीच्या षटकात कृणाल पांड्यानेही धवन असं करत असल्यानं गोलंदाजी करणे थांबवले. पोलार्डला DCच्या सलामीवीराला बाद करता आले असते, परंतु त्यानं वॉर्निंग देऊन सोडले.