IPL 2021, MI vs KKR, Live: कोलकाता नाइट रायडर्सनं मुंबई इंडियन्सवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय प्राप्त केला आहे. मुंबईनं दिलेलं १५६ धावांचं आव्हान कोलकातानं ७ विकेट्स आणि तब्बल २९ चेंडू राखून गाठलं. कोलकाताला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात नवं युवा अस्त्र सापडलं आहे. व्यंकटेश अय्यर कोलकाताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. व्यंकटेशनं आयपीएलमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी साकारली. व्यंकटेशचं हे अर्धशतक विशेष ठरलं कारण त्यानं अवघ्या २५ चेंडूत साजरं केलं. व्यंकटेशनं गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
व्यंकटेश अय्यरनं ३० चेंडूत ५३ धावा केल्या. अय्यर बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीनं फटकेबाजी सुरूच ठेवत कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्रिपाठीनं ३८ चेंडूत नाबाद ६७ धावा केल्या. यात ३ उत्तुंग षटकार आणि ७ खणखणीत चौकारांचा समावेश आहे. केकेआरचा दुसऱ्या टप्प्यातील हा सलग दुसरा विजय ठरला आहे. कोलकातानं आजच्या विजयानंतर १० गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. तर मुंबईची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
मुंबई इंडियन्सची सुरुवात दमदार झाली होती पण अखेरच्या षटकांमध्ये केकेआरनं मुंबईचा धावसंख्येला लगाम घातला. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर क्विंटन डीकॉकनं ४२ चेंडूत ५५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. यात ३ उत्तुंग षटकार आणि ४ चौकारांचा समावेश आहे. रोहित शर्मानंही चांगली साथ देत ३० चेंडूत ३३ धावांची खेळी साकारली. मुंबई इंडियन्सची दमदार सुरुवात पाहता संघाची धावसंख्या सहजपणे १८० धावांचा आकडा गाठेल अशी परिस्थिती होती. पण अखेरच्या षटकांमध्ये मुंबईचे फलंदाज एकामागोमाग एक तंबूत दाखल झाले आणि मुंबईला १५५ धावांवर समाधान मानावं लागलं.