आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सची सुरुवात अडखळत झाली. सलग तीन सामने हरल्यानंतर अखेर मुंबईनं काल पंजाब किंग्सवर विजय मिळवला. त्यामुळे मुंबईचं स्पर्धेतलं आव्हान अद्याप कायम आहे. मुंबईच्या विजयात हार्दिक पांड्यानं महत्त्वाची भूमिका बजावली. दुखापतीमुळे गेल्या काही सामन्यांना मुकलेल्या हार्दिकला पंजाबविरुद्ध सूर गवसला. त्यानं नाबाद ४० धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या हार्दिकनं त्याच्या खेळीचं श्रेय पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दिलं. शमीनं टाकलेला एक चेंडू हार्दिकच्या हाताला लागला. त्यानंतर हार्दिकनं पवित्रा बदलला. प्रत्येक सामना नवी संधी घेऊन येत असतो, ही गोष्ट आता माझ्या लक्षात येऊ लागली आहे, असं पांड्या म्हणाला. 'तुम्ही नायक होऊ शकता. तुमच्या संघाला विजय मिळवून देऊ शकता. गेल्या सामन्यांमध्ये काय घडलं ते मी विसरून जातो आणि प्रत्येक दिवशी १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो,' असं पांड्यानं सांगितलं. पंजाबविरुद्ध पांड्यानं ३० चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. त्यात २ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता.
रोहितकडून हार्दिकचं कौतुक
हार्दिकनं परिस्थितीनुसार खेळ केला. त्याची खेळी संघासाठी अतिशय महत्त्वाची ठरली. तो अनफिट असल्यानं संघाबाहेर होता. बऱ्याच अवधीनंतर तो मैदानावर उतरला. त्यामुळे त्यानं खेळपट्टीवर जास्त वेळ उभं राहणं गरजेचं होतं, अशा शब्दांत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं हार्दिकचं कौतुक केलं. आम्ही आमच्या क्षमतेनुसार, लौकिकाला साजेसा खेळ करत नाही ही बाब खरी आहे. ही स्पर्धा मोठी आहे आणि आम्हाला आमच्या योजनांवर ठाम राहायला हवं, असं रोहित पुढे म्हणाला.
Web Title: IPL 2021 MI vs PBKS hardik pandya credits mohammed shami for his innings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.