मुंबई इंडियन्सनं मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. पंजाबच्या ६ बाद १३५ धावांचा मुंबईनं १९ षटकांत ४ बाद १३७ धावा करून यशस्वी पाठलाग केला. या विजयासोबत मुंबईनं गुणतालिकेत १० गुणांसह पाचव्या स्थानी झेप घेतली. पंजाबकडून एडन मार्कराम ( ४२), दीपक हुडा ( २८) व लोकेश राहुल ( २१) चांगले खेळले. मुंबईच्या गोलंदाजांनी कमाल केली. जसप्रीत बुमराह ( २-२४) व किरॉन पोलार्ड ( २-८) यांनी विकेट्स घेतल्याच, शिवाय कृणाल पांड्या, नॅथन कोल्टर नायल, राहुल चहर यांनी टिच्चून मारा केला. प्रत्युत्तरात मुंबईच्या सौरभ तिवारी ( ४५) व हार्दिक पांड्या ( ४०*) यांची बॅट तळपली. पंजाबकडून रवि बिश्नोनीनं २ विकेट्स घेतल्या.
या सामन्यात कृणाल पांड्याच्या खिलाडूवृत्तीचं साऱ्यांकडून कौतुक होत आहे. कृणालनं टाकलेल्या ६व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ख्रिस गेलनं सरळ फटका मारला. त्यानं टोलावलेला चेंडू नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या लोकेश लाहुलच्या हाताला लागून कृणालकडे आला अन् त्यानं धावबाद केलं. मैदानावरील अम्पायर तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागणात तोच कृणालनं त्यांना थांबवलं. त्याच्या या खिलाडूवृत्तीनं सर्वांचं मन जिंकलं. पण, कृणालच्या या निर्णयामागे कर्णधार रोहित शर्मा याचा मोठा वाटा होता आणि तो व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यामुळेच लोकेश राहुलनं थम्ब दाखवून रोहितचे कौतुक केले.