IPL 2021 , Mumbai Indians vs Punjab Kings Live Updates : फॉर्माशी झगडणाऱ्या इशान किशनला ( ishan kishan) अखेर आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं ( MI) विश्रांती दिली. पंजाब किंग्सला ( PBKS) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण देताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मनदीप सिंग व लोकेश राहुल यांना बॅटीशी योग्य संपर्कच होत नव्हता. सहाव्या षटकात कृणाल पांड्यानं पंजाबला पहिला धक्का दिला. मनदीप १५ धावांवर पायचीत झाला. किरॉन पोलार्डनं एकाच षटकात दोन धक्के देत पंजाबची हालत खराब केली.
मुंबईनं आजच्या सामन्यात दोन बदल केले आणि मुख्य म्हणजे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान मिळवलेल्या इशान किशनला ( Ishan Kishan) आजच्या सामन्यात बाकावर बसवले आहे. अॅडम मिल्ने यालाही विश्रांती दिली गेली आहे. इशान किशन फॉर्माशी झगडत आहे आणि RCBविरुद्धच्या लढतीत अपयशानंतर तो रडवेला झाला होता. विराट कोहलीनं त्याला मार्गदर्शन केलं. अशात आजच्या सामन्यात इशानच्या जागी सौरभ तिवारी याला संधी मिळाली आहे, तर मिल्नेच्या जागी नॅथन कोल्टर नायल खेळत आहे.
किरॉन पोलार्ड यानं ७व्या षटकात पंजाबला दोन धक्के दिले. त्यानं ख्रिस गेल व लोकेश राहुल यांची विकेट घेत ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. गेल १ व लोकेश २१ धावांवर माघारी परतला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्यानं ३०० विकेट्स पूर्ण केल्या. १० हजार + धावा आणि ३०० विकेट्स घेणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला. ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर ११२०२ धावा आहेत आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या ख्रिस गेल ( १४२७५) याच्यानंतर पोलार्डचाच क्रमांक येतो.