IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला ( MI) आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं ( RCB) उत्तम सांघिक कामगिरी करून मुंबईला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करण्यास भाग पाडले. या निकालानंतर विराट कोहलीच्या संघानं १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावरील पकड मजबूत केली, तर रोहित शर्माच्या संघाची सातव्या स्थानी घसरण झाली. चांगली सुरुवात करूनही त्या पाच षटकांत मुंबई इंडियन्सच्या हातून हा सामना निसटला. बंगलोरच्या १६५ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ १११ धावांत तंबूत परतला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर म्हणून गौरविण्य़ात आले.
प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली ( ५१) व ग्लेन मॅक्सवेल ( ५६) यांनी अर्धशतक झळकावली. श्रीसक भरतनेही ३२ धावांचे योगदान देताना RCBला ६ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारून दिली. जसप्रीत बुमराहनं ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा ( ४३) व क्विंटन डी कॉक ( २४) यांनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावा जोडल्या, परंतु हे दोघंही माघारी परतताच मुंबईचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. कृणाल पांड्या, इशान किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव व किरॉन पोलार्ड हे एकेरी धावसंख्येवरच माघारी परतले. हर्षल पटेलनं हॅटट्रिकसह १७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलनं ११ धावांत ३, तर ग्लेन मॅक्सवेलनं २३ धावांत २ विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सचा डाव १८.१ षटकांत १११ धावांवर गडगडला.
रोहित शर्मा काय म्हणाला?
''RCBचा संघ १८० पार जाईल असे वाटत होते, परंतु आमच्या गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावली. मात्र, फलंदाजांनी माती खाल्ली. सलामीवीर सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत, परंतु त्यानंतर अन्य फलंदाजांनी त्यांची भूमिका पार पाडायला हवी. मी खराब फटका मारून बाद झालो आणि तोच माझ्यामते सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला. या परिस्थितीतून आता कमबॅक करण्याचा मार्ग शोधायला हवा. इशान किशन हा प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याला स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. मागील आयपीएलमध्ये त्यानं दमदार कामगिरी केलेली आहे. आता त्याला आणखी संधी द्यायची आहे,''असे रोहित शर्मा म्हणाला.
विराट कोहली काय म्हणाला?
''या विजयानं आनंद झालाच आहे. देवदत्तची विकेट लवकर गमावल्यानंतर कमबॅक करणं अवघड होतं. ग्लेन मॅक्सवेल व केएस यांनी अफलातून कामगिरी केली. आम्ही प्रयत्नच केले नसते तर बुमराहनं आम्हाला गुंडाळले असते. डॅन ख्रिस्टियननं अनुभव पणाला लावला, हर्षल पटेलनं पुन्हा एकदा अविश्वसनीय कामगिरी केली, '' असे विराटनं सांगितले.
Web Title: IPL 2021, MI vs RCB : I played a bat shot today and got out; I felt that was the game-changing moment, Say Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.