IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians Live Updates : रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक यांच्या सॉलिड सुरुवातीनंतरही मुंबई इंडियन्सची ( MI) गाडी घसरली. युझवेंद्र चहल व ग्लेन मॅक्सवेल यांच्या फिरकीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला ( RCB) पुनरागमन करून दिले. ११ ते १५ व्या षटकात सामना ९० अंशाच्या कोनानं फिरला अन् फ्रंट सिटवर बसलेला मुंबई इंडियन्सचा संघ अगदी सहजतेनं बॅकसीटवर फेकला गेला. त्या पाच षटकांत मुंबई इंडियन्सनं २० धावांत ४ फलंदाज गमावले. या सामन्यात मॅक्सवेलनं अष्टपैलू कामगिरी करताना ३७ चेंडूंत ५६ धावा केल्या अन् २३ धावांत २ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलनं १७व्या षटकात हॅटट्रिक घेत RCBचा विजय पक्का केला. चहलनं ११ धावांत ३ विकेट्स घेतल्या. हर्षलनं १७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) चा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आज भलत्याच फॉर्मात दिसला. पण, जसप्रीत बुमराहनं दुसऱ्याच षटकात देवदत्त पडिक्कलची ( ०) विकेट घेत RCBला धक्का दिला, परंतु विराटचा वेग काही कमी झाला नाही. ३८ धावांवर असताना हार्दिक पांड्यानं त्याचा झेल सोडला. केएस भरत २४ चेंडूंत ३२ धावांवर सूर्यकुमार यादवच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ग्लेन मॅक्सवेल व विराट यांची चांगली गट्टी जमली. ट्वेंटी-२०तील स्फोटक फलंदाज खेळपट्टीवर असूनही मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी त्यांना फार फटकेबाजी करू दिली नाही. ट्रेंट बोल्टनं १५व्या षटकात फक्त दोन धावा देत RCBवरील दडपण वाढवले आणि त्यामुळे पुढील षटकात अॅडम मिलनेच्या शॉर्ट बॉलवर विराट फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. विराटनं ४२चेंडूंत ( ३ चौकार व ३ षटकार) ५१ धावा केल्या. विराट माघारी परतल्यावर एबी डिव्हिलियर्सनं फटकेबाजी केली. मॅक्सवेलनं ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. बुमराहनं १९व्या षटकात मॅक्सवेलचा झंझावात रोखला. त्यानं ३७ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर डिव्हिलियर्सलाही ( ११) त्यानं बाद करून मोठा झटका दिला. ट्रेंट बोल्टनं अखेरचं षटक अप्रतिम फेकले. RCBला ६ बाद १६५ धावांवर समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात, रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक यांनी अक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी पाच षटकांत अर्धशतकी धावा फलकावर चढवल्या. ही जोडी तोडण्यासाठी विराटनं युझवेंद्र चहलला पाचारण केलं. ७व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चहलनं MIचा सलामीवीर क्विंटन डी कॉकला ( २४) बाद केले. चांगल्या फॉर्मात असणारा रोहित १०व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानं २८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ४३ धावा केल्या. मुंबईनं १० षटकांत २ बाद ७९ धावा केल्या होत्या आणि त्यांना ६० चेंडूंत ८६ धावा हव्या होत्या. इशान किशन पुन्हा अपयशी ठरला आणि चहलनं त्याला ९ धावांवर माघारी पाठवले. चहलनं ११व्या षटकात ३ धावा देत महत्त्वाची विकेट घेतली अन् इथे मुंबई इंडियन्सवर दडपण वाढत गेले. मॅक्सवेलचा गोलंदाज म्हणूनही उत्तम उपयोग करून विराटनं कल्पक नेतृत्वाची झलक दाखवली. मॅक्सवेलनं १४व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कृणाल पांड्या ( ५) बाद झाला. मॅक्सवेलनं २३ धावांत २ विकेट्स घेतल्या. MIला ६ षटकांत ६९ धावा करायच्या होत्या. १५व्या षटकात मोहम्मद सिराजच्या ऑफ साईडच्या Wide चेंडूवर सूर्यकुमार यादवनं ( ८) खराब फटका मारला अन् चहलनं सुरेख झेल टिपला.
डॅन ख्रिस्टिननं १६व्या षटकात सर्व चेंडू लेग साईटला फेकून फक्त ६ धावाच दिल्या. त्यामुळे २४ चेंडूंत ६१ धावा MIला बनवायच्या होत्या. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात पहिलाच सामना खेळणारा हार्दिक पांड्या ३ धावांवर विराटच्या हाती झेल देऊन बाद झाला. हर्षल पटेलनं पुढच्याच चेंडूवर किरॉन पोलार्डचा ( ७) त्रिफळा उडवला अन् मुंबई इंडियन्सच्या हातून सामना खेचून आणला. पुढच्याच चेंडूवर राहुल चहरला पायचीत करून हर्षल पटेलनं हॅटट्रिक पूर्ण केली. RCBसाठी हॅटट्रिक घेणारा हर्षल पटेल हा प्रविण कुमार ( २०१०) व सॅम्युअल बद्री ( २०१७) याच्यानंतर तिसरा खेळाडू ठरला. MIचा डाव १११ धावांवर गुंडाळून संघाला ५४ धावांनी विजय मिळवून दिला.