Join us  

IPL 2021, MI vs RR Live Updates : मुंबई इंडियन्सनं दणदणीत विजय मिळवला, इशान किशनचा फॉर्मही परतला; RRच्या आशा जवळपास मावळल्या

IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : गतविजेता मुंबई इंडियन्सचा ( MI) संघ आज संपूर्ण ताकदीनं खेळला. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 10:22 PM

Open in App

IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : गतविजेता मुंबई इंडियन्सचा ( MI) संघ आज संपूर्ण ताकदीनं खेळला. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावर मुंबईचे गोलंदाज खरे उतरले, विशेष करून पहिलाच सामना खेळणारा जिमी निशॅम व नॅथन कोल्टर-नायल यांनी मिळून सात विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहच्याही नावावर २ विकेट्स राहिल्या. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर फलंदाजांनी हात धुवून घेतले. त्यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची कत्तल करताना मुंबई इंडियन्सला दणदणीत विजय मिळवून दिला. मुंबईनं या विजयासह प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या आहेत. इशान किशननं २५ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारासह नाबाद ५० धावा केल्या.

राजस्थानची सलामीची जोडी एव्हिन लुईस आणि यशस्वी जैस्वाल हे आज अपयशी ठरले. पॉवर प्लेमध्ये लुईस व जैस्वाल यांना अनुक्रमे जसप्रीत बुमराह व नॅथन कोल्टर नाइल यांनी बाद केले. कर्णधार संजू सॅमसनही महत्त्वाच्या सामन्यात अपयशी ठरला. आज संधी मिळालेल्या जिमी निशॅमनं त्याला बाद केलं. ग्लेन फिलिप्सही विचित्र पद्धतीनं बाद झाल्यानं राजस्थानची अवस्था ५ बाद ५० अशी दयनीय झाली.डेव्हिड मिलर व राहुल टेवाटिया राजस्थानला सावरतील असे वाटत होते. पण, मिलर १५ व टेवाटिया १२ धावांवर माघारी परतले. निशॅमनं ४ षटकांत १२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या.  नॅथननं १४ धावांत ४ विकेट्स घेतल्या.    

चेन्नई सुपर किंग्सचे १९० धावांचे लक्ष्य सहज पार करणाऱ्या राजस्थानला आज मुंबईनं ९ बाद ९० धावांवर रोखले. पण, मुंबईला नेट रन रेट सुधारण्यासाठी हा सामना ९ किंवा त्यापेक्षा कमी षटकांत जिंकण्याचे आव्हान होते. रोहित शर्मा व इशान किशन या नव्या जोडीनं तशी आक्रमक सुरुवातही केली. रोहितला एकदा जीवदान मिळाले, परंतु चेतन सकारियानं त्याला २२ धावांवर बाद केले. सूर्यकुमार यादव झटपट १३ धावा करून बाद झाला. मुंबईनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये २ बाद ५६ धावा केल्या. हार्दिक पांड्याला बढती देण्यात आली. राजस्थानच्या क्षेत्ररक्षकांनी मुंबईच्या एकेक धावा रोखण्यासाठी जीव ओतून फिल्डिंग केली. पण, इशान किशन आज सुसाट होता, त्यानं चेतन सकारियानं टाकलेल्या ८व्या षटकात २४ धावा कुटल्या. मुंबईनं ८.२ षटकांत २ बाद ९४ धावा करून हा सामना जिंकला.

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सइशान किशनराजस्थान रॉयल्स
Open in App