Join us  

IPL 2021, MI vs RR Updates: मेडन ओव्हर खेळल्यावरही २५ चेंडूत ठोकले अर्धशतक, तडाखेबंद खेळीनंतर  Ishan Kishanने Virat Kohliचे मानले आभार

IPL 2021, MI vs RR Updates: मुंबई इंडियन्स माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर ईशान किशनने दमदार फलंदाजी करत मुंबईला केवळ ८.२ षटकांमध्येच विजय मिळवून दिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 10:26 AM

Open in App

शारजाह - आयपीएलमध्ये काल झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवत प्लेऑफसाठी आपले आव्हान कायम ठेवले आहे. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सला २० षटकांत अवघ्या ९० धावांतच रोखले. त्यानंतर मुंबई इंडियन्स माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर ईशान किशनने दमदार फलंदाजी करत मुंबईला केवळ ८.२ षटकांमध्येच विजय मिळवून दिला. या हंगामात खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या इशानने तडाखेबंद खेळी करत मुंबईला दणदणीत विजय मिळवून दिला. दरम्यान, या खेळीनंतर ईशान किशनने भारताचा कर्णधार विराट कोहलीचे विशेष आभार मानले. तसेच हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड यांचेही त्याने आभार मानले. ( Ishan Kishan thanks Virat Kohli for his half-century off 25 balls)

ईशान किशनने राजस्थान रॉयल्सविरोधात केवळ २५ चेंडूत ५० धावांची खेळी केली. यादरम्यान, त्याने तीन षटकार आणि पाच चौकार ठोकले. ईशान किशनची ही खेळी स्पर्धेतील मुंबईचे आव्हान कायम राखण्यासाठीही उपयुक्त ठरली. त्याचं कारण म्हणजे प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी मुंबईला नेट रनरेटमध्ये सुधारणा करण्याची गरज होती. ईशानच्या खेळीमुळे केवळ ८.२ षटकांत विजय मिळाल्याने मुंबईच्या संघाची खूप मदत झाली आहे.

ईशान किशनने या खेळीदरम्यान २५ पैकी १० चेंडू निर्धाव खेळले होते. त्यातही चेतन सकारिया याने टाकलेले एक षटक ईशान किशन निर्धाव खेळला. मात्र तरीही त्याने २०० च्या स्ट्राईक रेटने २५ चेंडूत नाबाद ५० धावा कुटल्या. तसेच मुंबईच्या संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला.

ईशान किशन आयपीएलमध्ये खराब फॉर्मशी झगडत होता. त्यामुळेच त्याला संघातून वगळण्यात आले होते. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळवल्या गेलेल्या सामनात ईशानने ९, १४, ११ आणि २० धावा काढल्या होत्या. दरम्यान, खराब फॉर्ममधून बाहेर आल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे आभार मानले.

ईशानने सांगितले की, संघात पुनरागमन करून धावा जमवल्यानंतर चांगलं वाटतंय. कुठल्याही खेळाडूसाठी चढ-उतार हे खेळाचा भाग असतात. मी यावेळी चांगल्या फॉर्ममध्ये नव्हतो. त्यानंतर माझं आमचा कर्णधार आणि इतर खेळाडूंशी बोलणं झालं. मी विराट, हार्दिक पांड्या यांच्याशी बोललो. पोलार्डनेपण मला काही मार्गदर्शन केले. या सर्वांशी झालेल्या बोलण्यामधून मला आत्मविश्वास मिळाला, असे ईशानने सांगितले.

ईशान किशनचे फॉर्ममध्ये परतणे भारतीय संगासाठी सुचिन्ह आहे. त्याचं कारण म्हणजे आयपीएलनंतर होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी ईशान किशनचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. 

टॅग्स :इशान किशनमुंबई इंडियन्सआयपीएल २०२१
Open in App