IPL 2021, Chennai Super Kings in Final : दुबई इंटरनॅशनल स्टेडियम आज 'धोनीमय' झालं... बऱ्याच दिवसांनी महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) मधील मॅच फिनिशर पाहायला मिळाला.. टॉम कुरनच्या गोलंदाजीवर धोनीनं मारलेला विजयी चौकारानंतर स्टेडियमवर एकच जल्लोष पाहायला मिळाला. CSKच्या ड्रेसिंग रुममध्ये सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर आनंदाने नाचू लागले. पण, त्याचवेळी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या दोन चिमुरड्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कॅमेरामननंही तो क्षण चुकवला नाही आणि दुबई स्टेडियमवरील मोठ्या स्क्रीनवर ती दोघं दिसताच सारे इमोशनल झाले. धोनीही त्याला अपवाद ठरला नाही. सामन्यानंतर आठवणीनं धोनीनं त्या मुलांची दखल घेतली अन् त्यांना स्वाक्षरी केलेला चेंडू भेट म्हणून दिला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्ससाठी पृथ्वी शॉ यानं ३४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या. त्यानंतर हेटमायर व रिषभ यांची दमदार खेळ केला. शिमरोन हेटमारनं ३७ धावा केल्या आणि रिषभ पंत ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला अन् दिल्लीनं ५ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉबीन उथप्पा ( ६३) व ऋतुराज गायकवाड ( ७०) यांच्या ११० धावांच्या भागीदारी नंतर महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) ६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून नाबाद १८ धावा करताना चेन्नईला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. महेंद्रसिंग धोनी आला अन् दुसऱ्याच चेंडूवर षटकार खेचला. चेन्नईला अखेरच्या षटकात १३ धावा हव्या होत्या. टॉम कुरनच्या षटकात धोनीनं तीन खणखणीत चौकार खेचले. चेन्नईनं ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला.