Join us  

IPL 2021 : मुंबई इंडियन्स ठरले ‘बाजीगर’, विजयाची गुढी; दहा धावांनी हिसकावला केकेआरच्या हातातून सामना

IPL 2021 :

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 6:53 AM

Open in App

- अयाज मेमन

चेन्नई :‘हार कर जितने वाले को बाजीगर कहते है...’ कोलकाता नाइट रायडर्सचा संघमालक आणि बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा हा प्रसिद्ध डायलॉग सत्यात उतरवला तो मुंबई इंडियन्सने. फलंदाज अडखळल्यानंतर बॅकफूटवर आलेल्या मुंबईकरांनी अखेरपर्यंत हार न मानता झुंजार खेळ करत कोलकाताला १० धावांनी नमवले. विजयी गुढी उभारत मुंबईकरांनी गुढीपाडव्याचा आनंद द्विगुणित करताना यंदाच्या सत्रातील पहिल्या विजयासह गुणांचे खातेही उघडले.आंद्रे रसेलच्या भेदकतेपुढे मुंबईला प्रथम फलंदाजी करताना १५२ धावांचीच मजल मारता आली. मात्र यानंतर फिरकीपटू राहुल चहरच्या जोरावर मुंबईने सामनाच फिरवत कोलकाताला ७ बाद १४२ धावांवर रोखले. राहुलने ४ षटकांत २७ धावा देत कोलकाताचे पहिले चार फलंदाज बाद केले. विशेष म्हणजे कोलकाताकडून नितिश राणा (५७) आणि शुभमान गिल (३३) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. कोलकाताने विनाकारण अतिआक्रमक खेळ केला. चहर भेदक मारा करत असताना त्याच्याविरुद्ध कोलकाताने विनाकारण मोठे फटके खेळले. मधल्या फळीचे अपयश कोलकाताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले. अखेरच्या दोन षटकांत १८ धावांची गरज असताना जसप्रीत बुमराहने १९व्या षटकात ४ धावा दिल्या, तर अखेरच्या षटकात ट्रेंट बोल्टने ४ धावा देत रसेल व पॅट कमिन्स यांना बाद करत मुंबईच्या विजयावर शिक्का मारला.त्याआधी रसेलने केवळ १२ चेंडूंत १५ धावा देत ५ बळी घेऊन मुंबईची दाणादाण उडवली. सूर्यकुमार यादवने आक्रमक अर्धशतक झळकावत एकाकी झुंज दिली. खेळपट्टीवर जम बसल्यानंतरही कर्णधार रोहित शर्माने संथ खेळी केल्याने मुंबईच्या धावगतीवर परिणाम झाला. हार्दिक पांड्या, किएरॉन पोलार्ड व कृणाल पांड्या यांनाही अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. मुंबईने अखेरचे ७ फलंदाज ३७ धावांत गमावले. शाकिब अल हसन, वरुण चक्रवर्थी, पॅट कमिन्स यांनी टिच्चून मारा करत मुंबईला आक्रमणापासून दूर ठेवले.

-  गेल्या चार वर्षांत कोलकाताने मुंबईविरुद्ध केवळ एक सामना जिंकताना तब्बल ११ सामने गमावले आहेत.- रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानी आला.- रोहितने आयपीएलमध्ये एकूण ५,२९२ धावांसह शिखर धवन (५२८२) आणि डेव्हिड वॉर्नर (५२५७) यांना मागे टाकले.- पहिल्या दोन आयपीएल सामन्यांत शून्यावर बाद होणारा मार्को जेन्सन हा जेसी रायडर (२००९) आणि अ‍ॅस्टन टर्नर (२०१९) यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला.- रसेलने कोलकातासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करताना सुनील नरेनची (५/१९) कामगिरी मागे टाकली.- मुंबईविरुद्ध पाच बळी मिळवणारा रसेल दुसरा गोलंदाज ठरला.- आयपीएलमध्ये अवघ्या दोन षटकांमध्ये पाच बळी घेणारा आंद्रे रसेल पहिला गोलंदाज ठरला.

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्स