IPL 2021, MI vs SRH, Live Updates: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये फॉर्म चांगला नसल्यानं त्याला संघाबाहेर बसावं लागलं होतं. नैराश्यालाही सामोरं जावं लागलं. पण मुंबईनं त्याला पुन्हा संधी दिली अन् त्यानं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. तेही एकदम कडssssक! हे वर्णन आहे मुंबई इंडियन्सचा शिलेदार आणि येत्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघासाठी निवड झालेल्या इशान किशनचं. (Ishan Kishan)
इशान किशननं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांचा जोरदार समाचार घेत अवघ्या १६ चेंडूत अर्थशतक ठोकलं आहे. मुंबई इंडियन्सकडून सर्वात जलद गतीनं अर्धशतक ठोकणारा इशान किशन पहिलाच फलंदाज ठरला आहे. तर यूएईत आजवर खेळविण्यात आलेल्या आयपीएल सामन्यांमध्ये १६ चेंडूत अर्धशतक कुणीच ठोकलं नव्हतं. इशान किशननं अबूधाबीच्या मैदानात चौकार आणि षटकारांची बरसात करत नवा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. या दमदार खेळीसह त्यानं खराब कामगिरीवरुन होत असलेल्या टीकांनाही प्रत्युत्तर दिलं आहे. याआधीच्या सामन्यातही इशान किशननं २५ चेंडूत अर्धशतक ठोकून संघाच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं होतं. आजतर मैदानात उतरताच पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून इशाननं आपला मनसुबा स्पष्ट केला आहे.
खरंतर आजचा सामना मुंबई इंडियन्ससाठी तितकाच महत्त्वाचा देखील आहे. कारण प्ले-ऑफमध्ये स्थान प्राप्त करण्यासाठी मुंबईला आज हैदराबादवर नुसता विजय प्राप्त करुन चालणार नाही. हैदराबादवर मुंबईला तब्बल १७० धावांहून अधिकच्या फरकानं सामना जिंकावा लागणार आहे. मुंबईनं असा करिश्मा केला तरच संघाला चौथ्या स्थानावर झेप घेत प्ले-ऑफमध्ये प्रवेश करता येणार आहे. संघाची गरज लक्षात घेत इशान किशननं खणखणीत फटकेबाजी करत जबरदस्त सुरुवात करुन दिली आहे. आयपीएलच्या इतिहासात १६ चेंडूत अर्धशतक ठोकणारा इशान किशन तिसरा फलंदाज ठरला आहे.