दुबई : ‘मुंबई इंडियन्सला सलग तीन सामने गमवावे लागले. या तिन्ही सामन्यांत मधल्या फळीचे अपयश चिंताजनक ठरले असून, यामुळे संघावर प्रचंड दडपण आले आहे’, असे मत मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक झहीर खान याने व्यक्त केले.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या पराभवानंतर झहीर म्हणाला की, ‘खेळपट्टी चांगली होती. आरसीबीने केलेली फलंदाजी आणि आमच्या फलंदाजीतील फरक दिसून येईल. गमावलेली लय ही आमची सध्याची अडचण आहे. मधली फळी सलग तीन सामन्यांत अपयशी ठरल्याने दबाव वाढला आहे. चांगल्या सुरुवातीनंतर सातत्याने बळी गमावले, तर कधीच पुनरागमन करता येणार नाही.’
हॅटट्रिक घेणाऱ्या हर्षल पटेलचे कौतुक करताना झहीर म्हणाला की, ‘त्याने शानदार मारा केला. संपूर्ण सत्रात तो शानदार ठरला असून, तो चांगल्याप्रकारे संथ चेंडू टाकतो.’ यावेळी झहीरने, ‘मुंबईकडून अनेकदा खराब सुरुवातीनंतर चांगली कामगिरी झाली असून, आताही मुंबई अशीच कामगिरी करुन पुनरागमन करेल’, असा विश्वासही व्यक्त केला.