आयपीएलच्या 14 व्या सिझनला सुरुवात झाली असून तडाखेबंद फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी पाहायला मिळत आहे. उत्तुंग षटकार डोळ्याचे पारणं फेडत असतानाच, अटीतटीच्या सामन्यांमुळे काळजात धकधकही होतंय. येथील काही खेळाडूंचा खेळ पाहता, अरे याला टी-20 विश्वचषक स्पर्धेत का संधी मिळाली नाही, असा प्रश्नही अनेकांना पडतोय. पंजाब किंग्ज इलेव्हनचा फलंदाज मयांक अग्रवालच्या फलंदाजीनेही अनेकांना हाच प्रश्न पडला आहे.
आयपीएल 2021 च्या दुसऱ्या फेजमधील तिसऱ्या सामन्यात मयांकने तुफानी फंलदाजी केली. त्यामुळे, टीकाकारांना आपल्या बॅटीनेच उत्तर देण्याचं काम मयांकने केलंय. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध आक्रमक खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. पंजाबला हा सामना केवळ 2 धावांनी गमावावा लागला, पण मयांकच्या खेळीने पंजाबला चांगली सुरुवात मिळाली होती. पंजाबकडून ओपनिंग करताना मयांकने 43 चेंडूत 67 धावांचा जबरी खेळ केला. त्यामध्ये, 2 छक्के आणि 7 चौकारही लगावले. तसेच, केएल राहुलसोबत 120 धावांची भागिदीरीही केली. त्यामुळेच, सामना गमावल्यानंतरही या मॅचचा हिरो मयांक ठरला.
टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. त्यामध्ये, पहिल्या 15 खेळाडूंत मयांकला संधी मिळाली नाही. मात्र, आजच्या खेळीतून निवड समितीला आपल्या फंदाजीतून ठोकण्याचं काम मयांकने केल्याचं दिसून येतंय. कारण, मयांकची निवड न होणं ही विचारधीन बाब ठरत आहे.