IPL 2021, Virender Sehwag: भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या तडाखेबाज फलंदाजीचे जसे सर्व चाहते आहेत. तसेच त्याच्या ट्विटचेही आता चाहते सोशल मीडियात आहेत. वीरुची हटके स्टाइल ट्विट्स नेहमी चर्चेचा विषय ठरतात. आता वीरुचं आणखी एक ट्विट सर्वांचं लक्ष वेधून घेतंय.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू दिल्लीला पडला 'महागात'; राजस्थानचा दमदार विजय
आयपीएलमध्ये गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या ख्रिस मॉरिसने अखेरच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करत संघाला विजय प्राप्त करुन दिला. यंदाच्या आयपीएलच्या लिलावात ख्रिस मॉरिस सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्यात पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या दोन चेंडूत विजयासाठी पाच धावांची आवश्यकता असताना संजू सॅमसननं एक धाव न घेता ख्रिस मॉरिसऐवजी स्वत:कडे स्ट्राइक ठेवणं पसंत केलं होतं. पण गुरुवारच्या सामन्यात राजस्थानचा निम्मा संघ माघारी परतलेला असताना ख्रिस मॉरिसनं तुफान फटकेबाजी करत निसटलेला सामना खेचून आणला आणि संघाला विजय प्राप्त करुन दिला. मागच्या सामन्यात न मिळालेल्या स्ट्राइकचा वचपाच जणू ख्रिस मॉरिसनं आजच्या सामन्यात काढला हाच धागा पकडून सेहवागनं ट्विट केलं आहे.
सेगवागनं ख्रिस मॉरिसचे पंजाब आणि दिल्ली विरुद्धच्या सामन्याचे दोन फोटो ट्विट केले आहेत. पंजाब विरुद्धच्या सामन्यात मॉरिसला स्ट्राइक मिळाली नव्हती. "पैसा मिला पर इज्जत नही मिली", असं पहिल्या फोटोला कॅप्शन दिलंय. तर दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मॉरिसनं दमदार कामगिरी केली. या फोटोला सेहवागनं 'इसे कहतें हे इज्जत', असं कॅप्शन दिलंय. "इज्जत भी, पैसा भी...वेल डन ख्रिस मॉरिस", असं म्हणत सेहवागनं मॉरिसच्या दिल्ली विरुद्धच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.
ख्रिस मॉरिस ठरला विजयाचा शिल्पकारमुंबईत वानखेडे मैदानात गुरुवात झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघानं दिलेलं १४८ धावांचं आव्हान राजस्थानच्या संघानं दोन चेंडू आणि तीन विकेट्स राखून पूर्ण केलं. राजस्थान रॉयल्सच्या अष्टपैलू ख्रिस मॉरिसनं १८ चेंडूत नाबाद ३६ धावांची खेळी साकारून संघाला विजय प्राप्त करुन दिला. यात ४ खणखणीत षटकारांचा समावेश आहे. मॉरिसनं या मॅच विनिंग खेळीसह आयपीएलच्या इतिहासातील त्याच्यावर लागलेली सर्वात मोठी बोली सिद्ध करुन दाखवली आहे. ख्रिस मॉरिसला यंदा लिलावात १६.२५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलं होतं.