UAE मध्ये आयपीएल(IPL) २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा मोठ्या उत्साहात खेळला जात आहे. याच काळात भारताच्या दिग्गज खेळाडूच्या डोक्यावरील पित्याचं छत्र हरपलं आहे. या खेळाडूच्या वडिलांचे निधन झालं आहे. IPL फ्रेंचाइसी टीमचा हा हिस्सा नाही परंतु एक्सपर्ट म्हणून आजही IPL कमेंट्री पॅनेलचा तो भाग आहे. या खेळाडूचं नाव पार्थिव पटेल असं आहे.
पार्थिव पटेलने(Parthiv Patel) सोशल मीडियावरून वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. भारताचा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक राहिलेल्या पार्थिव पटेलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही दु:खददायक बातमी दिली आहे. पार्थिव पटेल यांचे वडील अजयभाई बिपिनचंद्र पटेल यांचं निधन झालं असून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करा असं पार्थिवनं म्हटलं आहे. पार्थिव पटेलच्या वडिलांचे निधन रविवारी झालं.
२०१९ मध्ये पार्थिवच्या वडिलांना ब्रेन हेमरेज
पार्थिव पटेल यांच्या वडिलांना २०१९ मध्ये ब्रेन हेमरेज झालं होतं. त्यावेळी पार्थिव IPL रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचा भाग होता. पार्थिव टीम इंडियासाठी खेळणाऱ्या युवा खेळाडूंपैकी एक होता. वयाच्या १७ व्या वर्षी पार्थिव पटेलनं टीम इंडियामध्ये पदार्पण केले होते. क्रिकेटर पार्थिव पटेल यांच्या वडिलांच्या निधनानं क्रिकेट जगतात शोक व्यक्त केला जात आहे. भारतीय टीमचे माजी गोलंदाज आरपी सिंहनेही पार्थिवच्या वडिलांप्रती संवेदना व्यक्त केली आहे.
टीम इंडियाचा सर्वात तरुण यष्टीरक्षक
पार्थिव पटेलने १८ वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी २५ कसोटी सामने, ३८ एकदिवसीय सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातकडून १९४ क्रिकेट सामने खेळण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे आहे. पार्थिव पटेलने २००० साली भारतीय क्रिकेट संघात आगमन केले होते. भारतासाठी कसोटी सामने खेळणारा सर्वात युवा यष्टीरक्षक म्हणून पार्थिव पटेलच्या नावाची नोंद झाली आहे. त्यावेळी, पार्थिवचे वय १७ वर्षे १५३ दिवस होते. पार्थिवचे करिअर सुरू असतानाच भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंह धोनीचे आगमन झाले. त्यानंतर पार्थिवला भारतीय संघात संधी मिळाली नाही. भारतीय संघात पहिला सामना खेळल्यानंतर दोन वर्षे २ महिन्यांनी २००४ साली पार्थिवने गुजरातच्या संघासाठी रणजी सामना खेळला होता.