भारतातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहून आयपीएल २०२१ ( IPL 2021) मधून परदेशी खेळाडूंच्या माघारीचे सत्र सुरूच आहे. RCBचा अॅडम झम्पा व केन रिचर्डसन यांनी माघार घेतली, तर राजस्थान रॉयल्सच्या लायम लिव्हिंगस्टोन व अँड्य्रू टाय यांनीही बायो बललला कंटाळून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज आर अश्विन याच्या कुटुंबीयांना कोरोना झाल्यानं त्यानंही आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) यानं भारताला कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत केली आहे. त्यानं ५० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास ३० लाख रुपये PM Care Fundला दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानं अन्य सहकाऱ्यांनाही भारताला मदत करण्याचं आवाहन केलं. ( Pat Cummins donates $50,000 to PM Cares Fund in battle against Covid-19)
देशात मागील २४ तासांत ३ लाख ५३ हजार ९९१ नवे कोरोना रुग्ण आढळले असून २८१२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. २ लाख १९ हजार २७२ रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली. पॅट कमिन्स म्हणाला,''मी अनेक वर्ष भारतात येत आहे आणि मी या देशाच्या प्रेमात पडलो आहे. येथील लोकं खूप चांगली आहेत. कोरोना संकटात अनेकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, याची मला कल्पना आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आयपीएल खेळवणे योग्य की अयोग्य यावर चर्चा सुरू आहे. मी भारत सरकारला सांगू इच्छितो की लॉकडाऊनच्या काळात आयपीएलमुळे किमान चार तास तरी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत आहे.''
''एक खेळाडू म्हणून माझीही काही जबाबदारी आहे आणि मी PM Cares Fund साठी काही निधी दान करत आहे, विशेषकरून भारतातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या खरेदीसाठी हा निधी असेल. आयपीएलमधील मी माझ्या सहकाऱ्यांनाही मदतीचं आवाहन करतो,''असे तो म्हणाला.
आयपीएल २०२०च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सनं ऑसी गोलंदाज कमिन्सला १५.५० कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. मुंबईच्या वानखेडेवर २१ एप्रिलला झालेल्या सामन्यात पॅट कमिन्सनं ३४ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६६ धावांची वादळी खेळी केली होती.
Web Title: IPL 2021 : Pat Cummins donates $50,000 to PM Cares Fund in battle against Covid-19
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.