नवी दिल्ली : यंदा आयपीएल कोरोना सावटात खेळविले जात आहे. खेळाडू बायोबबलमध्ये असूनही धास्तावले आहेत. लीग सुरू होण्याआधी काही खेळाडू कोरोनाबाधित झाले होते. सामने सुरू होताच काहींच्या नातेवाइकांना कोरोनाची लागण झाल्याने खेळाडूंनी लीगला रामराम ठोकला.
आता पंच नितीन मेनन आणि पॉल रीफेल यांनी खासगी कारणास्तव माघार घेतली. इंदूरमध्ये वास्तव्य असलेले मेनन यांच्या आईला आणि पत्नीला कोरोना झाला शिवाय घरी लहान मुलगा आहे. ऑस्ट्रेलियाचे पॉल रीफेल हे सरकारच्या निर्णयामुळे चिंताग्रस्त होते. मायदेशी प्रवास करण्यास निर्बंध आहेत. मेनन यांना एक लहान मुलगा आहे. या दोघांची जागा अन्य पंच घेतील,’ असे बीसीसीआयने सांगितले.मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा ॲडम झम्पा, केन रिचर्डसन आणि अँड्र्यू टाय यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर घरच्यांना कोरोनाची लागण झाल्याने रविचंद्रन अश्विनने माघार घेतली.
पॉल रीफेल यांचा प्रवास लांबला
पॉल रीफेल यांनी माघारीचा निर्णय घेतला तरी त्यांना विमान प्रवासबंदीमुळे मायदेशी परतणे कठीण झाले आहे. ते आता ३० मे नंतरच ऑस्ट्रेलियाकडे रवाना होऊ शकतील. ते सध्या अहमदाबाद स्थित आपल्या हॉटेलमध्येच असून त्यांनी बायोबबल सोडलेले नाही. ते म्हणाले,‘ काही दिवसांपूर्वी काही खेळाडू दोहामार्गे मायदेशी परतले, मात्र आता तो मार्गदेखील बंद झाला आहे. त्यामुळे बायोबबलबाहेर पडण्याचा निर्णय मी रद्द केला.