IPL 2021: देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या सुरू असलेली आयपीएल स्पर्धा तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. यासोबत देशातील जनतेच्या आरोग्यापेक्षाही आयपीएलला जास्तीचं महत्व का दिलं जातंय याची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा विचार बीसीसीआय आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनने करावा असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
अॅड. करण सिंग ठुकराल आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन सिंग यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. याआधी भारताचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनीही आयपीएल स्थगित करण्याची मागणी केली होती. कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कीर्ती आझाद यांनी आयपीएल तात्काळ थांबविण्यात यावी असं म्हटलं होतं.
बीसीसीआय आणि DDCA तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय स्टेडियमचा उपयोग कोरोनाग्रस्तांसाठी करण्यात यावा अशीही विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणी ५ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दिल्ली हायकोर्टा याबाबत कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.