नवी दिल्ली : चढ-उतारांचा अनुभव घेत असलेला मुंबई इंडियन्स संघ आपली मोहीम योग्य मार्गावर आणण्यासाठी आतुर असून, शनिवारी येथे खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) विजयी रथ रोखण्यास प्रयत्नशील असेल.
यूएईमध्ये गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या स्पर्धेत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरल्यानंतर सीएसके यावेळी बदललेल्या निर्धारासह मैदानात उतरला आहे आणि पहिली लढत गमावल्यानंतर त्यांनी सलग पाच सामने जिंकले आहेत. सध्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके संघ गुणतालिकेत १० गुणांसह अव्वल स्थानी आहे.
मुंबई इंडियन्सची आतापर्यंतची कामगिरी चढ-उतार असलेली ठरली आहे. त्यांना सहा सामन्यांपैकी केवळ तीन सामन्यांत विजय मिळविता आला; पण फिरोजशाह कोटलामध्ये खेळल्या गेलेल्या गेल्या लढतीत त्यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध सात गड्यांनी विजय मिळविल्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे; पण आता त्यांच्यापुढे खेळाच्या प्रत्येक विभागात शानदार कामगिरी करीत असलेल्या सीएसके संघाचे आव्हान आहे. धोनीच्या संघानेही मुंबईप्रमाणे दिल्लीतील टप्प्याची सुरुवात चांगली केली आहे.