अहमदाबाद : तीन सामन्यांनंतर पराभवाची मालिका खंडित करणारा पंजाब किंग्स संघ सोमवारी येथे इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध (केकेआर) विजयी लय कायम राखण्यास प्रयत्नशील असेल. पंजाबने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली होतीे; पण त्यानंतर त्यांना सलग तीन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला.
शुक्रवारी पंजाबने गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध नऊ गड्यांनी विजय मिळवित पराभवाची मालिका खंडित केली. पंजाब संघ आता केकेआरविरुद्ध विजय मिळविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. केकेआर संघाला गेल्या चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे.
पंजाबची फलंदाजी मजबूत असून, कर्णधार लोकेश राहुलचा संघातर्फे कामगिरीत सातत्य राखणाऱ्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. त्याने मुंबईविरुद्ध नाबाद ६० धावांची खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पाच सामन्यांतील हे त्याचे तिसरे अर्धशतक होते. सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवालही चांगल्या फॉर्मात आहे, तर युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने मुंबईविरुद्ध नाबाद ४३ धावांची खेळी करीत सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत.