मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) यांच्यादरम्यान आयपीएलच्या १४ व्या पर्वात रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत रंगतदार लढतीची अपेक्षा आहे.
उभय संघ केवळ दोन गुण मिळविण्यासाठी नव्हे, तर आपली विजय मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहेत. आरसीबीने आतापर्यंत चारही सामने जिंकले असून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता, सीएसकेने पहिली लढत गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करीत तीन सामने जिंकले. गुणतालिकेत हा संघ दुसऱ्या स्थानी दाखल झाला आहे. आरसीबीने गेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा १० गड्यांनी पराभव केला होता.
सनरायजर्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सची भिस्त पंतवर-
आपल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघ रविवारी येथे खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध विजयाचा दावेदार म्हणून सुरुवात करील. या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना ऋषभ पंतची आक्रमक फलंदाजी व राशीद खानचा भेदक मारा यादरम्यान जुगलबंदी अनुभवाला मिळेल. आपल्या संथ प्रकृतीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या चेपॉकच्या खेळपट्टीवर यंदाच्या सत्रातील १० वी व अखेरची लढत आहे.