लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाची आयपीएलमध्ये गुरुवारी संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सविरुद्ध गाठ पडणार आहे. विराटच्या नेतृत्वाखालील आरसीबी हा सामना जिंकण्यास कुठलीही कसर शिल्लक ठेवायची नाही, या निर्धारासह उतरणार हे निश्चित.
दोन्ही संघांनी यंदा वेगळ्या पद्धतीने सुरुवात केली. सलग तीन विजयामुळे आरसीबीचा आत्मविश्वास उंचावला. मुंबई, हैदराबाद आणि केकेआरला धूळ चारणारा विराटचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. रॉयल्सचे तीनपैकी केवळ एक विजय नोंदविला. चेन्नईकडून मागचा सामना हरताच हा संघ सहाव्या स्थानावर आला. त्यांना दुसऱ्या विजयाची प्रतीक्षा असेल. सांघिक कामगिरीचा अभाव ही रॉयल्सची कमकुवत बाजू आहे. संजूने शानदार शतकी धडाका करूनही त्यांना पंजाबविरुद्ध चार धावांनी पराभवाचा धक्का बसला होता. दिल्लीविरुद्धच्या विजयात द. आफ्रिकेचे डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिस यांचे योगदान राहिले. सीएसकेविरुद्ध जोस बटलरला अन्य सहकाऱ्यांची साथ मिळाली नव्हती. विजय मिळवायचा झाल्यास रॉयल्सला सांघिक कामगिरीचीच गरज असेल.
दिल्लीविरुद्ध राजस्थानच्या गोलंदाजांनी खूप धावा दिल्या. सकारिया व जयदेव उनाडकट यांचा मारा वगळता अन्य अनुभवी गोलंदाजांकडून भरपूर अपेक्षा आहेत. आरसीबीचे डिव्हिलियर्स व ग्लेन मॅक्सवेल यांच्यापुढे मारा करताना राजस्थानला योजना आखाव्याच लागतील. कोहली व पडिक्कल यांच्या खेळीवरही निर्बंध घालावे लागतील.
आरसीबीचा गोलंदाजी मारा बलाढ्य आहे. त्यांच्याकडे वेगवान हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, डॅनियल ख्रिस्टियन, डावखुरा शाहबाज अहमद आणि लेग स्पिनर ॲडम झम्पा हे सामना फिरविणारे गोलंदाज आहेत.
Web Title: IPL 2021 Preview: Today's match, RCB's decision to beat Rajasthan Royals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.