नवी दिल्ली : पहिली लढत गमावल्यानंतर समतोल साधत शानदार कामगिरी करणारा चेन्नई सुपरकिंग्स संघ (सीएसके) आयपीएलमध्ये बुधवारी येथे सनरायजर्स हैदराबादविरुद्ध प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करणार आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने पहिली लढत गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले. त्यांनी सलग चार सामने जिंकले आणि आता त्यांना नवे स्थळ फिरोजशाह कोटला मैदानावरही विजय मोहीम कायम राखण्याची आशा आहे. तीन वेळच्या चॅम्पियन चेन्नई संघासाठी २०२०चे पर्व चांगले गेले नव्हते; पण यावेळी संघातील अनुभवी खेळाडू त्यांच्यासोबत असून, ते आपली छाप पाडत आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजाने सीएसकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जडेजाने रविवारी आरसीबीविरुद्ध अखेरच्या षटकात ३७ धावा फटकावत एकट्याच्या बळावर संघाला विजय मिळवून दिला. त्याने आपल्या डावखुऱ्या फिरकीने बळीही घेतले आणि क्षेत्ररक्षणातही छाप सोडली. सलामीवीर फलंदाज रुतुराज गायकवाड व फाफ ड्यूप्लेसिस चांगल्या फॉर्मात आहेत, तर सुरेश रैना व अंबाती रायुडू यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.