Join us  

IPL 2021: प्रीव्ह्यू- आजचे सामने: राॅयल्सपुढे आज मुंबईकरांची परीक्षा

दिल्लीकडे शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ आणि कर्णधार ऋषभ पंत धावा काढण्यात यशस्वी ठरले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:26 AM

Open in App

अहमदाबाद : आयपीएलमध्ये  विजयी लय कायम राखायची झाल्यास  कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सच्या दमदार माऱ्यापुढे भक्कमपणे धावा काढण्याचे अवघड आव्हान असणार आहे. केकेआर संघ फलंदाजांच्या कचखाऊ वृत्तीपुढे हतबल दिसतो.

युवा शुभमन गिल याने सहा सामन्यात केवळ ८९ धावा केल्या. फलंदाजी त्यांच्या कामगिरीत मोठा अडथळा ठरली आहे. गोलंदाजीत मात्र सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रभावी कामगिरी बजावली. पंजाबला मागच्या सामन्यात १२३ धावात रोखल्यानंतर लक्ष्य गाठतेवेळी आघाडीची फळी गोंधळली होती. ऐनवेळी मॉर्गन धावून आल्यामुळे चार पराभवांची मालिका खंडित होऊ शकली.

दिल्लीकडे शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ आणि कर्णधार ऋषभ पंत धावा काढण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांची बरोबरी साधण्यासाठी केकेआरच्या आघाडीच्या फळीलादेखील धावा काढाव्याच लागतील. त्यासाठी फलंदाजी क्रम बदलावा लागू शकतो. दिग्गज सुनील गावसकर यांनीही अशीच सूचना केली होती. दिल्लीला मागच्या सामन्यात आरसीबीकडून एका धावेने पराभव पचवावा लागला. रविचंद्रन अश्विनने माघार घेतल्यानंतरही ईशांत शर्मा, कागिसो रबाडा, अवेश खान, अमित मिश्रा, अक्षर पटेल यांच्या माऱ्यापुढे केकेआरच्या फलंदाजांची कठोर परीक्षा असेल.  कर्णधार पंतने आरसीबीविरुद्ध जबाबदारीने फलंदाजी केली खरी, पण त्याला आवश्यक धावगती राखता आली नव्हती. त्यामुळे पंतवर अधिक जबाबदारी असेल.

राॅयल्सपुढे आज मुंबईकरांची परीक्षा

नवी दिल्ली : सलग दोन सामने गमविणाऱ्या मुंबई इंडियन्सला गुरुवारी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सवर विजय नोंदविण्याचे आव्हान असेल. मात्र त्यासाठी त्यांना मधल्या फळीतील उणिवा दूर कराव्याच लागतील. मागच्या सामन्यात मुंबईला पंजाब किंग्सकडून नऊ गड्यांनी पराभवाचे तोंड पहावे लागले. आता कोटलाच्या खेळपट्टीवर दमदार कामगिरीसह विजयपथावर पोहोचण्याची त्यांच्याकडे संधी आहे. 

 रॉयल्सने आतापर्यंत तीन सामने गमावले. मागच्या सामन्यात मात्र त्यांनी केकेआरवर सहा गडी राखून मात केली. या कामगिरीची मुंबईविरुद्ध पुनरावृत्ती व्हावी, असा त्यांचा प्रयत्न असेल.  मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने यंदा २०१ धावा केल्या, पण मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आले. याशिवाय क्विंटन डिकॉककडून मोठी खेळी अपेक्षित आहे. मुंबईची चिंता त्यांच्या मधल्या फळीचे अपयश आहे. सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड हे अद्यापही प्रभावी ठरलेले नाहीत. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह यांनी डेथ ओव्हरमध्ये टिच्चून मारा केला आहे. लेग स्पिनर राहुल चहर आणि कृणाल हेदेखील भेदक ठरले.

राजस्थान अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, लियॉम लिव्हिंगस्टोन यांच्या माघारीमुळे संघ कमकुवत झाला. सलामी जोडीही अस्थिर आहे. मनन वोहरा व यशस्वी जैस्वाल धावा काढू शकले नाहीत. जोस बटलर व सॅमसन यांनाच आता धावांचा वेग वाढविण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग यांनाही महत्त्वाचे योगदान द्यावे लागेल. अष्टपैलू ख्रिस मॉरिसच्या कामगिरीवर या संघाचा विजय विसंबून असेल. 

टॅग्स :आयपीएल २०२१