दुबई - कोरोनामुळे अर्ध्यावरच थांबवाव्या लागलेल्या आयपीएलच्या उत्तरार्धातील सामन्यांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयचे अँटी करप्शन युनिट या सामन्यांवर बारीक लक्ष ठेवून आहे. दरम्यान, पंजाब किंग्सचा अष्टपैलू दीपक हुड्डा त्याच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटच्या रडारवर आहे. आयपीएलचा ३२ वा सामना पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मंगळवारी खेळवला गेला होता. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी दीपक हुड्डाने सोशल मीडियावर आपला एक फोटो पोस्ट केला होता. आता अँटी करप्शन युनिट हुड्डाने भ्रष्टाचारासंबंधीत मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन तर केले नाही ना, याचा तपास करत आहे. (Punjab all-rounder Deepak Hooda's troubles escalate, BCCI's ACU team to probe post)
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एसीयूच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा इन्स्टाग्राम पोस्टकडे टीमकडून दुर्लक्ष केले गेले. मात्र एसीयूकडून निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे या पोस्टमुळे उल्लंघन झाले नाही ना, याची पडताळणी आम्ही करणार आहोत. आमच्या निर्धारित निर्बंधांनुसार संघाची रचना किंवा प्लेइंग इलेव्हनबाबत काहीही जाहीर करता येत नाही. मात्र दीपक हुड्डाच्या या पोस्टमुळे तो प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे आणि संध्याकाळी खेळण्यासाठी उतरणार आहे, असे संकेत मिळत आहेत.
क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर फॅन्सच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजेत का, असे विचारले असता एसीयूच्या अधिकाऱ्याने सांगितले की, काय करावे, काय करू नये यासाठी स्पष्ट दिशानिर्देश दिलेले आहेत. गेल्या वर्षी एसीयू प्रमुख अजित सिंह यांनी सांगितले होते की, त्यांच्या पथकाकडून सोशल मीडियावरील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले जाते.
माजी एसीयू प्रमुख अजित सिंह यांनी सांगितले होते की, हे पाहा, मॅच व्हेन्यूंची संख्या कमी आहे आणि कोरोनाच्या साथीमुळे फिजिकल मुव्हमेंटमध्येही अडचणी आहेत. अशा परिस्थितीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क प्रस्थापित केला जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही यावर बारीक लक्ष ठेवत आहोत. तसेच एसीयूच्या नजरेतून काहीही सुटू नये, असा आमचा प्रयत्न आहे.