अयाज मेमन
कन्सल्टिंग एडिटर
रवीचंद्रन अश्विनला वादात अडकून घेण्याची सवय जडलेली दिसते. विशेषत: आयपीएलमध्ये. काही पर्वांआधी नॉन स्ट्रायकिंगला असलेल्या जोस बटलरविरुद्ध घडलेल्या प्रसंगामुळे क्रिकेट विश्व मतप्रदर्शनात विभाजित झाले होते. या पर्वात दिल्ली- केकेआर सामन्यात घडलेल्या प्रसंगामुळे अश्विन पुन्हा चर्चेत आला. राहुल त्रिपाठीने थ्रो केलेला चेंडू ऋषभ पंतच्या बॅटला लागून गेल्यानंतर अश्विनने धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावरुन गोलंदाज टिम साऊदी आणि कर्णधार इयोन मोर्गनसोबत अश्विनचा वाद झाला. सोशल मिडियाने वादात तेल ओतले. नेहमी सहजपणे वावरणाऱ्या मोर्गनने अश्विनला ‘खेळ बदनाम’ करणारा असे संबोधले. मैदानावरील या वादाला अश्विननेही ट्विट करीत प्रत्युत्तर दिले.
अश्विनच्या धाव घेण्याच्या त्या प्रयत्नावर पुन्हा एकदा आजीमाजी खेळाडू मतप्रदर्शनात विभागले आहेत.शेन वॉर्न आणि जिमी निशाम यांनी मोर्गनची बाजू घेतली तर अश्विनची बाजू योग्य ठरविणाऱ्या विरेंद्र सेहवागने हा वाद मोठा केल्याबद्दल दिनेश कार्तिक याला धारेवर ठरले आहे. सेहवागच्यामते कार्तिकने मोर्गनच्या कानात काहीतरी सांगितले. अश्विनला साथ देणाऱ्या भारतीय चाहत्यांनी मात्र मोर्गनला चांगलेच धारेवर धरले. २०१९च्या वन डे विश्वचषकाचा अंतिम सामना आठवत असेल. बेन स्टोक्सच्या बॅटला लागून चेंडू सिमेपलिकडे गेला. इंग्लंडला त्यावेळी पाच धावा मिळाल्या. न्यूझीलंडच्या ऐतिहासिक पराभवाचे ते मोठे कारण ठरले.
चेंडू डिफ्लेक्ट झाला हे माहित असताना अश्विनने धाव घेण्याचा प्रयत्न केल्यावरुन त्याच्यावर ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’चा भंग केल्याची टीका होते. पण स्पिरिट ऑफ क्रिकेट म्हणजे नेमके काय? क्रिकेट नियमाचा भंग होत नसेल तर स्वत:च्या लाभासाठी चुकीचा अर्थ काढू नये. नियम आणि स्पिरिट यात मोठा फरक आहे. स्टोक्सच्या प्रकारामुळे ५ धावा मिळाल्या तेव्हा मोर्गनची खेळभावना कुठे गेली होती? त्याने त्या धावा नम्रपणे नाकारल्या का? माझ्या मते स्पिरिट ऑफ़ क्रिकेटच्या नावाखाली बुचकळ्यात टाकणारे, हितावह निर्णय घेतले जातात.
हे मी केले नसते - बेथ मुनी
पंचांनी नाबाद ठरवूनही पूनम राऊतने खिलाडूवृत्ती दाखवीत मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या या निर्णयाचे जगभर कौतुक झाले. मात्र, आस्ट्रेलियन महिला खेळाडू बेथ मुनी हिने आपण ही गोष्ट करू शकलो नसतो अशी प्रांजळ कबुली दिली. मुनी म्हणाली, ‘मी निश्चितच हे करू शकले नसते. बाद असूनही पंचांचा निर्णय जर तुमच्या बाजूने जात असेल तर मी तरी स्वत:हून मैदान सोडून जाण्याचा मोठेपणा दाखविला नसता.’