IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाचा प्रमुख फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) यानं गुरुवारी सोशल मीडियावरून टीकाकारांना फैलावर घेतलं. कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) विरुद्धच्या सामन्यात घडलेल्या प्रकारानंतर आर अश्विनच्या खिलाडूवृत्तीवर इंग्लिश, ऑस्ट्रेलियन मीडियाकडून टीका झाली. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न यानंही भारताच्या फिरकीपटूवर टीका केली. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) मैदानावर उतरून अश्विनच्या मागे उभा राहिला. आता या सर्व घडामोडीनंतर अश्विन शांत बसतो तर कसला... त्यानंही गुरुवारी सोशल मीडियावरून KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) याला खडेबोल सुनावले. अश्विननं त्याच्यावर केलेल्या प्रत्येक आरोपांचं उत्तर देताना, त्याच्याकडून कोणतीच चूक झाली नव्हती, हे स्पष्ट केले.
DC vs KKR या सामन्यात दिल्लीच्या डावाच्या १९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीनं थ्रो फेकला आणि चेंडू DC कर्णधार रिषभ पंतच्या हाताला लागून दूर गेला. तेव्हा नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या आर अश्विननं एक अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न केला. KKRच्या खेळाडूंना अश्विनचं हे वागणं आवडलं नाही आणि त्याची कृती अखिलाडूवृत्ती असल्याचे मत व्यक्त करण्यात आलं. जेव्हा अश्विन बाद होऊन तंबूत परतत होता, तेव्हा KKRचा गोलंदाज टीम साऊदीसोबत त्याचा वाद झाला. ( Eoin Morgan and Ashwin)
सामन्यानंतर मॉर्गन म्हणाला की, ''मी जे पाहिलं त्यावर विश्वास बसत नाही. हे कृत्य आयपीएलमध्ये येणाऱ्या युवा पिढीसमोर ठेवले जाणारे भयानक उदाहरण आहे. वेळ आल्यानंतर अश्विनला याचा पश्चाताप नक्की होईल.''
अश्विननं यावर मॉर्गनला फैलावर घेतले. तो म्हणाला,''खेळाडूनं चेंडू फेकला आहे, हे पाहताच मी धाव घेण्यासाठी पळालो आणि तो चेंडू रिषभ पंतला लागला आहे, हे मला माहीत नव्हतं. जर मी ते पाहिलं असतं, तर मी पळालो असतो का?, तर हा मी धाव घेण्यासाठी नक्की पळालो असतो आणि तसं करण्याची परवानगी मला आहे. मॉर्गनच्या बोलण्यानं मी वाईट व्यक्ती होतोय का?, मला तसं नाही वाटत. ''
''मी भांडण नाही केलं, मी माझ्यासाठी उभा राहिलो. माझे आई-वडील व शिक्षकांनी जे शिकवलंय तेच मी केलं. तुम्ही पण तुमच्या मुलांना स्वतःसाठी खंबीरपणे उभं राहणं शिकवा. मॉर्गन व साऊदी त्यांना वाटेल त्याचा चुकीचं म्हणू शकतात, परंतु मला तत्वज्ञानाची वार्ता करताना अपशब्द वापरण्याचा त्यांना अधिकार नाही,''असेही तो म्हणाला.
दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांचा फुल्ल सपोर्टदिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी अश्विनच्या समर्थनात ट्विट केलं. त्यांनी लिहीलं की, जेव्हा चेंडू बेन स्टोक्सच्या बॅटला लागून चौकार गेला होता, तेव्हा इंग्लंडला अतिरिक्त धावा मिळाल्या होत्या. त्यानंतर हाच संघ वर्ल्ड चॅम्पियन बनला होता. तेव्हा कोणाला त्रास झाला नाही. आता अश्विन एक अतिरिक्त धाव घेण्यासाठी धावला, तर सर्व वेडेपीसे झालेत. हा दुटप्पीपणा आहे. अश्विन आम्ही तुझ्यासोबत आहोत.''