- अयाज मेमन
मुंबई : नव्या नावासह मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्स संघाने तुफानीफटकेबाजी करत राजस्थान रॉयल्सविरुद्ध २० षटकांत ६ बाद २२१ धावांचा एव्हरेस्ट उभारला. यासह यंदाच्या आयपीएलमध्ये २०० धावांचा टप्पा पार करणारा पंजाब पहिला संघ ठरला. दीपक हूडा, कर्णधार लोकेश राहुल व धडाकेबाज ख्रिस गेल यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थानच्या गोलंदाजांची हवा निघाली.वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकत राजस्थानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला खरा, मात्र पंजाबने चौफेर फटकेबाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांना चोपले. दीपकने सर्वांनाच चकीत करत २८ चेंडूंत ६८ धावा चोपताना ४ चौकार व ६ षटकारांचा पाऊस पाडला. त्याने श्रेयस गोपाळच्या १४व्या षटकात ३ षटकार खेचले. दीपक-राहुल यांनी तिसऱ्या गड्यासाठी ४५ चेंडूंत १०५ धावांची जबरदस्त भागीदारी केली.मयांक अग्रवाल वेगवान सुरुवात करुन दिल्यानंतर झटपट परतला. राहुल आणि गेल यांनी पंजाबच्या धावसंख्येला वेग दिला. गेल स्थिरावल्याचे दिसत असताना रियान परागचा शिकार ठरला. यानंतर राहुलचा वेगही कमी झाला. मात्र,दीपकच्या वादळी खेळीमुळे पुन्हा एकदा त्याला जोर आला आणि पंजाबने बघता बघता दोनशे पलीकडे मजल मारली. राहुल तेवटियाने सीमारेषेवर घेतलेल्या अप्रतिम झेलमुळे लोकेश राहुलचे शतक ९ धावांनी हुकले. यंदाच्या लिलावात सर्वात महागडा ठरलेला ख्रिस मॉरिस मैदानावरही महागडाच ठरला. त्याने २ बळी घेतले, मात्र यासाठी त्याला दहाहून अधिक इकोनॉमी रेटने धावा खर्च कराव्या लागल्या.
गेलचा विक्रमी ‘गेम’!गेलने पंजाबकडून आयपीएलची सुरुवात करताना २०१८, २०१९ आणि २०२० अशी सलग तीन मोसम पहिल्या सामन्यात अर्धशतक ठोकले. यावेळी मात्र त्याचे अर्धशतक १० धावांनी हुकले. त्याचप्रमाणे, आयपीएलमध्ये ३५० षटकार पूर्ण करणारा गेल पहिला फलंदाज ठरला.
शंभर सामन्यानंतर संजू बनला कर्णधारतब्बल शंभरहून अधिक आयपीएल सामने खेळल्यानंतर संजू सॅमसन कर्णधार बनला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरला. तसेच, सर्वाधिक सामने खेळल्यानंतर कर्णधार ठरलेल्यांमध्ये तो आता तिसºया स्थानी आला आहे. मुंबई इंडियन्सचा किएरॉन पोलार्ड सर्वाधिक १३७ सामने खेळल्यानंतर कर्णधार बनला होता. रविचंद्रन अश्विनने १११ सामने खेळल्यानंतर पहिल्यांदा नेतृत्त्व केले होते.