Join us  

IPL 2021: राजस्थान रॉयल्सची भिस्त विदेशी खेळाडूंवर

कर्णधार सॅमसन, संचालक संगकारा जोडी जेतेपद मिळवून देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 5:00 AM

Open in App

नवी दिल्ली : आमूलाग्र बदल करीत मैदानात आलेला राजस्थान रॉयल्स संघ यंदाच्या आयपीएलमध्ये नवा इतिहास लिहिण्याची तयारी करीत आहे. तथापि कमकुवत भारतीय पथक आणि  विदेशी खेळाडूंवर विसंबून राहण्याची वृत्ती  या दोन्ही गोष्टी पहिल्या पर्वात विजेता बनलेल्या या संघाची वाटचाल बाधित करू शकतात.मागच्या वर्षी अखेरच्या स्थानावर राहिल्यामुळे रॉयल्सने व्यवस्थापन आणि संघात आमूलाग्र बदल केले. स्टीव्ह स्मिथला रिलीज करीत संजू सॅमसनकडे नेतृत्व सोपविले. प्रशिक्षक ॲण्ड्र्यू मॅक्‌डोनाल्ड यांना बाहेरचा रस्ता दाखवून श्रीलंकेचा माजी महान खेळाडू कुमार संगकारा याच्याकडे क्रिकेट संचालकपद दिले.जोफ्रा आर्चरवर सर्वाधिक विसंबून असलेल्या या संघाने वेगवान मारा बलाढ्य करण्यासाठी द. आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिस याला १६ कोटी २५ लाख इतकी रक्कम मोजून संघात घेतले. आयपीएल इतिहासात तो सर्वांत महागडा खेळाडू ठरला. मागच्या वर्षी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब जिंकणारा आर्चर मात्र जखमी असल्याने सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. संघासाठी हा मोठा धक्का मानला जातो. रॉयल्सचा पहिला सामना १२ मार्च रोजी पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे.आक्रमक फलंदाजी जमेची बाजू आक्रमक फलंदाजी ही संघाची भक्कम बाजू मानली जाते. जोस बटलर, बेन स्टोक्स हे मॅचविनर फलंदाज आहेत. सॅमसन हा स्वत: प्रतिभावान फलंदाज असून दक्षिण आफ्रिकेचे डेव्हिड मिलर आणि मॉरिस हेदेखील फटकेबाजीत   अव्वल मानले जातात. इंग्लंडचा टी-२० तज्ज्ञ लियॉम लिव्हिंगस्टोन हा सामना फिरविण्यात तरबेज असून, मागच्या वर्षी अष्टपैलू कामगिरी करणारा राहुल तेवतिया मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे.अनुभवहीन नेतृत्व कर्णधार सॅमसनचा फॉर्म आणि सातत्य यांवर नेहमी प्रश्न उपस्थित होतात. तथापि कौशल्य आणि क्षमतेच्या बळावर तो राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याचा दावेदार ठरतो. कर्णधारपदाचा अधिक अनुभव नसल्यामुळे जबाबदारीचा फटका फलंदाजीतील कामगिरीला बसू शकतो. नेतृत्व करीत असताना तो अधिक ताकदीने फलंदाजी करू शकेल का, याविषयी शंका आहे. रॉयल्सला मोक्याच्या क्षणी त्याच्या अनुभवहीनतेमुळे नुकसान सोसावे लागू शकते. या संघाने मागच्या वर्षी वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर काही सामने जिंकले; मात्र सांघिक कामगिरीत अपयश आले होते.भारतीय खेळाडूंकडून सातत्याची अपेक्षासंगकाराच्या रूपाने रॉयल्सकडे दमदार रणनीतितज्ज्ञ उपलब्ध आहे. मात्र दिग्गज भारतीय खेळाडूंचा संघाकडे अभाव असून, स्थानिक खेळाडूंमध्ये सातत्याचा अभाव जाणवतो. सॅमसनची कामगिरी मागच्या केवळ पाच सामन्यांत प्रभावी जाणवली. २०१८ ला ११ कोटी ५० लाख रुपयांत खरेदी करण्यात आल्यापासून जयदेव उनाडकटने अपेक्षित कामगिरी केलेली नाही. मनन वोहरा काही प्रसंगी लक्षवेधी ठरला. यान पराग, वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी आणि यशस्वी जयस्वाल या युवा खेळाडूंकडून अपेक्षा असेल. कमकुवत मारामॉरिस संघात असला तरी आर्चरच्या अनुपस्थितीत वेगवान मारा कमकुवत वाटतो. आर्चर किती लवकर संघात परततो, यावर पुढील वाटचाल अवलंबून असेल. विदेशी खेळाडू आणि स्थानिकांचे योगदान बरोबरीचे असेल तरच या संघाला विजयी झेप घेणे सोपे होणार आहे.राजस्थान रॉयल्स संघ  संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, बेन स्टोक्स, यशस्वी जायसवाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मयंक मार्कंडेय, जोफ्रा आर्चर, ॲण्ड्र्यू, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे,  ख्रिस मॉरिस, मुस्ताफिजूर रहमान, चेतन सकारिया, केसी करियप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव आणि आकाशसिंग.

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्स