IPL 2021, RCB: आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. अबू धाबीच्या मैदानात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची (Royal Challengers Bangalore) लढत कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध आहे. आजच्या सामन्यात कोहलीच्या संघानं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. नाणेफेकीसाठी कोहली मैदानात दाखल होताच त्यानं परिधान केलेली निळ्या रंगाची जर्सी यामागचं कारण ठरली आहे.
IPL 2021: 'सचिनचा विक्रम मोडायचाय म्हणून कोहलीनं कॅप्टन्सी सोडली'
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ दरवेळी लाल रंगाच्या जर्सीमध्ये खेळताना आपण पाहिला आहे. याशिवाय हिरव्या रंगाच्या जर्सीतही याआधी आरबीसीच्या खेळाडूंनी लक्ष वेधून घेतलं होतं. पण यावेळी संघ निळ्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरला आहे. नाणेफेकीवेळी समालोचकांनी विराट कोहली याला यामागचं कारण विचारलं असता त्यानं केलेल्या विधानानं सर्वांचं मन जिंकलं आहे.
गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून भारतासह संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीला सामोरं जात आहे. या घातक विषाणूच्या विरोधात लढताना कोविड योद्धे स्वत:च्या जीवाचीही पर्वा न करता लोकांचा जीव वाचवण्यासाठी लढा देत आहेत. त्यामुळे कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी पीपीई किटच्या रंगाची म्हणजेच निळ्या रंगाची जर्सी परिधान करण्याचं संघानं ठरवलं. याबाबत सविस्तर माहिती कोहलीनं यावेळी दिली.
आरसीबीकडून एक खास व्हिडिओ देखील ट्विट करण्यात आला आहे. यात आरसीबीनं कोविड योद्ध्यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांना सॅल्यूट केला आहे. यात आरसीबीचे खेळाडू निळ्या रंगाच्या जर्सीत दिसत आहेत.