शारजा : आपल्या पहिल्या आयपीएल जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या रॉयल चॅलेंजर बँगलोरला आज कोलकाता नाईट रायडर्सच्या तगड्या आव्हानाचा मुकाबला करावा लागणार आहे. कर्णधार म्हणून विराटचे हे शेवटचे आयपीएल असल्याने तो संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवणार नाही. तर दुसरीकडे आयपीलच्या दुसऱ्या सत्रापासून कामगिरी उंचावत प्लेऑफमध्ये धडक मारणारा कोलकाताचा संघ हीच लय कायम ठेवत अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असेल. दोन्ही संघांचा एकूण विचार केला तर कोलकात्याता संघ बँगलोरपेक्षा काकाणभर सरस वाटतो आहे. कारण दुबईत आयपीएलचे दुसरे सत्र सुरू होण्याआधी कोलकात्याचा संघ सातव्या स्थानावर होता. मात्र इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली या संघाने कमालीची कामगिरी उंचावत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. आयपीएलच्या पहिल्या सत्रात अप्रतिम कामगीरी करणारा बँगलोरचा संघ दुबईत सुरू झालेल्या दुसऱ्या सत्रात काहीसा ढेपाळला. पण विराटने संघाला वेळीच सावरत प्लेऑफची वाट अधिक बिकट होणार नाही याची काळजी घेतली. दिल्लीविरुद्ध शेवटच्या चेंडूवर मिळवलेला विजय बँगलोर संघासाठी प्रेरणादायी ठरू शकतो.
फिरकी गोलंदाजी केकेआरची खरी ताकद
दुबईतल्या संथ खेळपट्टीवर कोलकात्याच्या फिरकी गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली आहे. विशेषत: वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांच्या फिरकीचे चक्रव्यूह भेदणे अनेक संघाना कठीण होऊन बसले होते.
शाकिबच्या समावेशाने ही तिकडी अधिक धोकादायक झाली आहे. तर दुसरीकडे गेल्या सामन्यात युवा शिवम मावीने त्याच्या वेगवान गोलंदाजीने राजस्थानच्या फलंदाजांची भंबेरी उडविली होती. त्याला न्युझीलंडच्या अनुभवी लॉकी फर्ग्युसनचीही योग्य साथ मिळते आहे. फलंदाजीत केकेआरला युवा व्यकंटेश अय्यरकडून मोठ्या अपेक्षा असतील. शुभमन गील आणि व्यंकटेश अय्यर या सलामीच्या जोडीने अनेक वेळा केकेआरला चांगली सुरुवात करून दिली आहे. कोलकातासाठी चितेंची बाब म्हणजे कर्णधार इयोन मॉर्गनचा फॉर्म. मध्यला फळीत संघाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मॅॅक्सवेल, भरत बँगलोरचे तारणहार ठरले आहेत.
मजबूत फलंदाजांच्या फळीसाठी प्रसिद्ध असलेल्या बँगलोरच्या संघाला या आयपीएलमध्ये खऱ्या अर्थाने तारले आहे ते ग्लेन मॅक्सवेलने. यंदाच्या आयपीएलमध्ये मॅक्लवेल ४९८ धावा केल्या आहेत. गेल्या काही सामन्यांपासून त्याला मधल्या फळीत श्रीकर भरतकडून मोलाची साथ मिळते आहे. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर संघाला विजय मिळवून दिल्यामुळे श्रीकर भरतचा आत्मविश्वास सध्या दुणावलेला आहे. लयीत असणाऱ्या मधल्या फळीतील या दोन फलंदांजांना विराट आणि देवदत्त पड्डीकलने चांगली सुरुवात करून दिली तर हा संघ मोठी धावसंख्या उभारू शकतो. तसेच या सामन्यात एबी डिव्हीलियर्सच्या एका अफलातून खेळीचीही संघाला प्रतीक्षा असेल. कारण अद्याप एबी डिव्हीलियर्स छाप पाडू शकलेला नाही. गोलंदाजीत पर्पल कॅप स्वत:कडे असलेल्या हर्षल पटेलवर कोलकात्याचे सलामीचे फलंदाज झटपट बाद करण्याची जबाबदारी असेल. तर कोलकात्याच्या मध्यल्या फळीसाठी चहलची फिरकी अधिक घातक ठरू शकते.
त्यामुळे प्लेऑफचा हा सामना जिंकत आणि फायनलमध्ये धडक मारता आपले पहिले विजेतेपद पटकावण्यासाठी बँगलोर अधिक जोर लावताना दिसेल. शिवाय संघाचा कर्णधार म्हणून शेवटचे आयपीएल खेळणारा विराट आरसीबीला विजेतेपद मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावताना दिसेल. तर दुसरीकडे इंग्लंडकडून विश्वचषकाची ट्रॉफी उंचावणारा मॉर्गन त्याचीच पुनरावृत्ती आयपीएलमध्ये करण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे या दोन्ही तुल्यबळ संघांमधील द्वंद अधिक रोमहर्षक होण्याची शक्यता आहे.
Web Title: IPL 2021, RCB Vs KKR, Eliminator IPL 2021: Kolkata Knight Riders spin challenge in front of Royal Challengers Bangalore
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.