IPL, 2021 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Eliminator Live : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( RCB) सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, देवदत्तच्या विकेटनंतर कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) विराट कोहली अँड टीमची गाडी घसरली. इयॉन मॉर्गननं त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करून घेताना RCBच्या धावसंख्येला चाप लावली. सुनील नरीन हा सप्राईज पॅकेज ठरला. प्रती षटक एक बळी अशी त्यानं चार षटकांत के भरत, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स व ग्लेन मॅक्सवेल या चार महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी पाठवले. प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याच्या निर्धाराला नरीननं तडा दिला. RCBला कसाबसा समाधानकारक पल्ला गाठता आला.
विराट कोहली व देवदत्त पडिक्कल या जोडीनं थोडासा सावध पण आश्वासक खेळ करताना RCBची धावसंख्या हलती ठेवली. विराटनं पाचव्या षटकात चौकार खेचून ट्वेंटी-२०तील ९००वा चौकार मारला. अशी कामगिरी करणारा तो शिखर धवन ( ९८६) याच्यानंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. Most fours in T20 Cricket ख्रिस गेल ११०५ चौकारांसह अव्वल स्थानावर आहे. देवदत्तनं आयपीएलच्या सलग दुसऱ्या पर्वात ४०० धावा पूर्ण केल्या, परंतु आज त्याला मोठी खेळी करता आली नाही. फर्ग्युसननं टाकलेला चेंडू त्याच्या बॅटची किनारा घेत यष्टींवर आदळला अन् देवदत्तला २१ धावांवर माघारी जावं लागलं. त्यानं विराटसह पहिल्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या.
KKRच्या गोलंदाजांचा सामना करताना विराट व मॅक्सवेल चाचपडताना दिसले. चेंडू व बॅटचा योग्य संपर्कच होत नसल्यानं विराटही निराश दिसत होता. याच निराशेत नरिनच्या गोलंदाजीवर टार्गेट करण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् त्याचा त्रिफळा उडाला. विराटनं ३३ चेंडूंत ५ चौकारांसह ३९ धावा केल्या. Sunil Narine removes Virat Kohli. विराटच्या विकेटनंतर KKRच्या खेळाडूंमध्ये वेगळाच उत्साह संचारला. २०१४नंतर नरीननं पहिल्यांदाच विराटची विकेट घेतली. गोलंदाज खडूस मारा करतच होते, त्यांना क्षेत्ररक्षकही सुरेख साथ देताना दिसले. नरीननं सलग तिसऱ्या षटकात KKRला मोठी विकेट मिळवून दिली. यावेळेस त्यानं एबी डिव्हिलियर्सचा (११) त्रिफळा उडवला.