IPL 2021, RCB vs KKR, Highlights: आयपीएलच्या १४ व्या सीझनच्या पहिल्या टप्प्यात गोंधळलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघानं दुसऱ्या टप्प्यात मात्र दमदार सुरुवात केली आहे. बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा कोलकातानं ९ विकेट्सनं धुव्वा उडवला. कोलकातानं बंगलोरच्या संघाला अवघ्या ९२ धावांत गुंडाळलं. त्यानंतर फक्त १ विकेट गमावून सामन्याच्या १० व्या षटकातच बंगलोरचं आव्हान गाठलं आणि गृहपाठ पक्का करुन मैदानात उतरल्याची चुणूक दाखवून दिली आहे.
IPL 2021, RCB vs KKR, Highlights:
- सामन्याची नाणेफेक खरंतर कोहलीनं जिंकली होती आणि फलंदाजीचा निर्णय घेतला होता. अबूधाबीच्या खेळपट्टीचा नूर पाहता कोहलीचा निर्णय योग्य वाटत होता. पण कोलकातानं आजच्या सामन्यासाठीचा गृहपाठ पक्का केला होता. याची प्रचिती सामन्याच्या पहिल्याच षटकापासून आली. कोलकातानं यावेळी वरुण चक्रवर्तीच्या फिरकी गोलंदाजीनं डावाची सुरुवात केली. पुढं जाऊन चक्रवर्तीच केकेआरच्या गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र ठरला.
- वरुण चक्रवर्तीनं आरबीसीच्या ग्लेन मॅक्सेवल, वाहिंदु हसरंगा, सचिन बेबी यांना बाद केलं. तर काइल जॅमीसन याला धावचित केलं. त्यामुळे आरबीसीच्या चार खेळाडूंना बाद करण्यात चक्रवर्तीचं मोठं योगदान होतं. चक्रवर्तीच्या फिरकीसमोर आरसीबीनं नांगी टाकली. तर दुसऱ्याबाजूनं सुनील नारायण यानंही आरसीबीच्या धावांना वेसण घातली.
- आरसीबीकडून २०० वा आयपीएल सामना खेळणाऱ्या कोहलीच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. पण वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णानं कोहलीला त्याच्या ट्रॅपमध्ये ओढलं आणि पायचीत केलं. संघाचा कर्णधारच स्वस्तात बाद झाल्यानंतर मैदानात असलेल्या दोन युवा फलंदाजांवर काहीसं दडपण आलेलं पाहायला मिळालं. कोहली बाद झाल्यानंतर आजच्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळालेला श्रीकर भरत फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. पडिक्कलनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यात काही त्याला यश आलं नाही.
- केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन याचं इथं विशेष कौतुक करावं लागेल. त्यानं संघातील उपलब्ध गोलंदाजी पर्यायांचा अचूक वापर केला आणि आरसीबीचा एक एक करुन काटा काढला. कोहली ब्रिगेडवर वेसण घालण्यास यामुळेच यश मिळालं.
- ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली हे दिग्गज धारातीर्थी पडले आणि केकेआरनं सामन्यावर पकड निर्माण केली. आरसीबीचा डाव ९२ धावांतच संपुष्टात आला.
- सलामीजोडीसाठी गोंधळात सापडलेल्या केकेआरनं यावेळी युवा खेळाडूला हेरलं आणि संधी दिली. व्यंकटेश अय्यरनं मिळालेल्या संधीचं सोनं करत केकेआरला तारलं. इतकंच नव्हे, तर नजाकती फटके लगावत आपली योग्यता सिद्ध करुन दाखवली आहे. त्यामुळे यापुढील सामन्यांमध्येही अय्यरनं आपली जागा आता जवळपास निश्चित केलेली दिसत आहे.
- लक्ष्य लहान असलं तरी धावांची सरासरी उत्तम ठेवण्याच्या मनसुब्यानं शुबमन गिलं आणि अय्यरनं जोशात फलंदाजी केली. यात आरसीबीच्या गोलंदाजांना हेरुन या दोन युवा फलदाजांनी खणखणीत फटके लगावले. आरसीबीचं ९२ धावांचं लक्ष्य केकेआरनं १० व्या षटकात गाठलं.
- शुबमन गिल ४८ धावा करुन बाद झाला. त्यानंतर आंद्रे रसेलला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. पण रसेलला फलंदाजी करण्याची वेळच येऊ न देता युवा जोश व्यंकटेश अय्यर विनिंग फटका लगावत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
Web Title: IPL 2021 RCB vs KKR Highlights KKR beat rcb by 9 wickets here is the full match story in points
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.