IPL 2021, RCB vs KKR Live: आयपीएलमध्ये रविवारच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) कोलकाता नाइट रायडर्सच्या (KKR) गोलंदाजांचा समाचार घेत २०५ धावांचं आव्हान दिलं आहे. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलनं सर्वाधिक ७८ धावांची जबरदस्त खेळी साकारली तर अखेरच्या षटकांमध्ये एबी डीव्हिलियर्सचं वादळ पाहायला मिळालं. डीव्हिलियर्सनं अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ७६ धावांची खेळी साकारली.
विराट कोहलीनं सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कोलकाताच्या वरुण चक्रवर्थीनं आरसीबीला सुरुवातीलाच दोन झटके देऊन दमदार सुरुवात केली होती. चक्रवर्थीनं सामन्याच्या दुसऱ्याच षटकात विराट कोहलीला (५) तर रजत पाटीदार (२) याला बाद केलं होतं. त्यामुळे कोलकातानं सामन्यावर पकड निर्माण केली होती. पण ग्लेन मॅक्सवेलनं मैदानात येताच तुफान फटकेबाजी करत आरसीबीवरील दबाव संपुष्टात आणला. मॅक्सवेलनं मैदानाच्या कानाकोपऱ्यांमध्ये फटकेबाजी करत ४९ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्यानं ७८ धावांची खेळी साकारली.
मॅक्सवेल बाद झाल्यानंतर डीव्हिलियर्सनं संघाची कमान सांभाळत कोणताही दबाव निर्माण न होऊ देता आपला नैसर्गिक खेळ केला. डीव्हिलियर्सनं अखेरच्या पाच षटकांमध्ये कोलकाताच्या गोलंदाजीला नेस्तनाभूत करत अवघ्या ३४ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि तीन षटकांच्या साथीनं नाबाद ७६ धावा कुटल्या.