IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : तिसऱ्या अम्पायरच्या वादग्रस्त निर्णयानं गाजलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं ( RCB) पंजाब किंग्ससमोर ( PBKS) तगडं आव्हान उभं करण्यात यश मिळवलं. देवदत्त पडिक्कलची विकेट तिसऱ्या अम्पायरनं ढापली आणि त्याचा त्यानं फायदाही उचलला. ग्लेन मॅक्सवेल सुसाट सुटला होता आणि त्यानं चौकारापेक्षा षटकारच अधिक लगावताना पंजाबच्या गोलंदाजांना हैराण केलं.
RCBचा कर्णधार विराट कोहली यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट व देवदत्त पडिक्कल यांनी RCBला चांगली सुरुवात करून देताना पॉवर प्लेत ५५ धावा कुटल्या. त्यानंतर PBKSचा कर्णधार लोकेश राहुलनं फिरकी गोलंदाजांना पाचरण केलं. हरप्रीत ब्रारनं ७व्या षटकात दोन धावा दिल्या आणि रवी बिश्नोईनं ८व्या षटकात ४थ्या चेंडूवर पडिक्कलची विकेट घेतलीच होती. पडिक्कलचा बिश्नोईच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसला अन् चेंडू यष्टीरक्षक लोकेश राहुलच्या हाती विसावला. त्यानंतर लोकेशनं जोरदार अपील केले आणि मैदानावरील पंचांनी नाबाद निर्णय दिला. त्याविरोधात लोकेश लगेच तिसऱ्या पंचाकडे गेला. त्याच चेंडू पडिक्कलच्या ग्लोव्हजला घासल्याचे स्पष्ट दिसत होते, परंतु तिसऱ्या अम्पायरनंही पडिक्कलला नाबाद दिले अन् लोकेशचा पारा चढला.
पण, याची भरपाई पंजाब किंग्सनं केली. १०व्या षटकात मोईजेस हेन्रीक्सनं RCBचा सलग दोन धक्के दिले. २५ धावांवर खेळत असलेल्या विराटचा त्यानं त्रिफळा उडवला अन् डॅन ख्रिस्टीयनला पहिल्याच चेंडूवर पॉइंटवर उभ्या असलेल्या सर्फराज खानच्या हाती झेल देऊन माघारी परतला. हेन्रीक्सची हॅटट्रिक हुकली असली तरी पुढील षटकात त्यानं RCBची आणखी एक विकेट घेतली. पडिक्कल ४० धावांवर यष्टीरक्षक लोकेशच्या हाती झेल देऊन परतला. ग्लेन मॅक्सवेलनं उत्तुंग षटकार खेचत अर्धशतक पूर्ण करून RCBला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करून दिली. एबी डिव्हिलियर्सनंही त्याला चांगली साथ दिली, परंतु सर्फराज खाननं अचूक थ्रो करताना ही जोडी तोडली. एबीला ( २३) त्यानं धावबाद केलं.
ग्लेन मॅक्सवेलचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकात मॅक्सवेलची विकेट घेतली. त्यानं ३३ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून ५७ धावा केल्या. ११.४ षटकांत RCBच्या ३ बाद ७३ धावा असताना मॅक्सवेल खेळपट्टीवर आला अन् संघाला मोठा पल्ला गाठून दिला. शमीनं त्या षटकात आणकी दोन विकेट घेतल्या. बंगलोरला ७ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारता आली.