IPL 2021 RCB vs RR Live Match Score Updates Mumbai : मुंबईच्या वानखेडे मैदानावर गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या सलामीवीरांचं वादळ पाहायला मिळालं. राजस्थान रॉयल्सनं दिलेलं १७८ धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघानं एकही विकेट न गमावता दिमाखात गाठलं आणि दणदणीत विजय साजरा केला. राजस्थाननं १७८ धावांचं आव्हान देऊनही संघ पराभूत का झाला? काय आहेत यामागची कारणं?
IPL 2021, RCB vs RR T20 Match Highlight :
- वानखेडे म्हटलं की सामन्याची नाणेफेक अतिशय महत्वाची ठरते. बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. कारण दुसऱ्या डावात मैदानात दव पडल्यानं चेंडू ओला होतो आणि फलंदाजांना मदत होते.
- फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी असूनही राजस्थानची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. सलामीचे चार फलंदाज स्वस्तात माघारी परतले. यातीन तीन फलंदाज तर पावर-प्लेमध्येच बाद झाले होते. सामन्याच्या आठव्या षटकात राजस्तानची अवस्था ४ बाद ४३ अशी होती.
- राजस्थानचे फॉर्मात असलेले आणि महत्वाचे फलंदाज स्वस्तात माघारी गेल्यानं संघावर मोठं दडपण आलं. जोस बटलर (८), मनन वोहरा (७), डेव्हिड मिलर (०), संजू सॅमसन (२१) असे स्वस्तात बाद झाले होते. त्यामुळे संघ १३० धावांचा टप्पा देखील ओलांडू शकणार नाही अशी परिस्थिती होती.
- शिवम दुबे आणि रियान पराग यांनी चांगली भागीदारी रचून संघाच्या धावसंख्येला सावरलं. त्यामुळे राजस्थाननं सामन्यात पुनरागमन केलं होतं. पण मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात शिवम दुबे (४६) आणि रियान पराग (२५) धावा करुन बाद झाले.
- अखेरच्या षटकांमध्ये राहुल तेवतियानं तुफान फटकेबाजी करत २३ चेंडूत ४० धावा वसुल केल्या. पण त्याला साजेशी साथ मिळू शकली नाही. ख्रिस मॉरिस अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर झेल देऊन बसला. शेवटचं संपूर्ण षटक खेळता येईल या मानसिकतेनं मॉरिस खेळला असता तर धावसंख्येत आणखी काही धावांची नक्कीच भर पडली असती.
- एकंदर वानखेडेची सपाट खेळपट्टी पाहता राजस्थाननं उभारलेलं १७८ धावांचं आव्हानही उत्तम फलंदाजांचा भरणा असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी कमीच होतं. त्यात पडिक्कल आणि कोहली यांनी डावाची सुरुवातच आक्रमक करुन आपले मनसुबे स्पष्ट केले होते.
- विराट कोहली लेग स्पीनसमोर अडखळतो आणि विकेट गमावतो याचा विचार करुन राजस्थानकडून पॉवर-प्लेमध्येच श्रेयस गोपाळ याला गोलंदाजी देण्यात आली. पण विराटनं यावेळी राजस्थानचा निर्णय चुकीचा ठरवून दाखवला.
- विराट आणि पडिक्कल यांनी पावर-प्लेमध्येच खोऱ्यानं धावा वसुल केल्या. श्रेयस गोपाळ याच्या पहिल्याच षटकात कोहलीनं षटकार ठोकला. त्यामुळे कॅप्टन संजू सॅमसनची खेळी अपयशी ठरली. त्यानंतर तिसऱ्या षटकातही सॅमसननं कोहलीला बाद करण्याच्या उद्देशातून श्रेयस गोपाळ यालाच गोलंदाजी दिली. पण या षटकात केवळ एकच चेंडू विराट कोहली खेळला आणि पाच चेंडू पडिक्कलने खेळले. यात पडिक्कलनं दोन खणखणीत चौकार लगावले.
- राजस्थान रॉयल्सच्या एकाही गोलंदाजाला सुर गवसला नाही. नेमक्या टप्प्यात चेंडू मिळाल्याचा फायदा कोहली आणि पडिक्कल यांनी उचलला व संपूर्ण सामन्यात आपली पकड कायम ठेवली.