मुंबई: गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केल्यानं रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा आत्मविश्वास दुणावला आहे. सलग दोन सामने गमावणाऱ्या आरसीबीनं अखेर मुंबईला पराभूत करत विजयी लय प्राप्त केली. आता त्यांचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. गुणतालिकेत विराटचा संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यांनी १० पैकी ६ सामने जिंकले आहेत. राजस्थानविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित होईल. तर राजस्थानसाठी हा सामना करो या मरो स्वरुपाचा असेल. १० सामन्यांत ८ गुण मिळवणाऱ्या राजस्थानला विजय आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा मावळतील.
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना लागोपाठ २ सामन्यांत पराभव पत्करावा लागला. कोलकात्यानं अवघ्या ९२ धावांत आरसीबीचा खुर्दा उडवला. या सामन्यात कोलकात्यानं ९ गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सनं त्यांचा पराभव केला. मुंबईवर विजय मिळवत आरसीबीनं हरवलेला सूर पुन्हा मिळवला. कोहलीनं लागोपाठ दोन अर्धशतकं झळकावली असून ग्लेन मॅक्सवेलनं ३७ चेंडूंत ५६ धावा करत चमक दाखवली.
डिव्हिलियर्स, जेमिन्सननं टेन्शन वाढवलंदक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सला गेल्या ३ सामन्यांत केवळ २३ धावा करता आल्या आहेत. डिव्हिलियर्ससाठी आरसीबीनं ११ कोटी मोजले. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिन्सनदेखील खराब फॉर्ममध्ये आहे. जेमिन्सनला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी आरसीबीनं तब्बल १५ कोटी खर्च केले. मात्र २ सामन्यांत त्याला एकही विकेट मिळालेली नाही. जेमिन्सनं ९.६० च्या इकॉनॉमीनं धावा दिल्या. त्यामुळे कोट्यवधी मोजून ताफ्यात दाखल झालेले खेळाडू आरसीबीसाठी डोकेदुखी ठरत आहेत.