IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Live Updates : आयपीएल २०२१च्या गुणतक्त्यात अव्वल दोन संघांत एन्ट्री मारण्याचे विराट कोहलीचे स्वप्न पूर्ण झाले नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघानं बुधवारी उत्तम सांघिक कामगिरी केली, परंतु त्यांना सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाकडून सडेतोड उत्तर मिळाले. भुवनेश्वर कुमारनं अखेरच्या चेंडूपर्यंत सामना ताणला अन् एबी डिव्हिलियर्ससारखा फलंदाज समोर असूनही RCBला पराभवाचा धक्का दिला.
आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं सलामीच्या जोडीत प्रयोग केला. वृद्धीमान सहाएवजी SRHनं डावखुऱ्या अभिषेक शर्मा व जेसन रॉय ही जोडी उतरवली. पण तो १३ धावांवर बाद झाला. कर्णधार केन विलियम्सन ( ३१) याचे कव्हर ड्राईव्ह नेत्रदिपक होते. त्यानं जेसन रॉयसह दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. प्रियाम गर्गला आज स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली, परंतु अवघ्या १५ धावा करून तो माघारी परतला. रॉयनं ४४ धावा केल्या, डॅनिएल ख्रिस्टीयननं स्वतःच्याच गोलंदाजीवर त्याचा अफलातून झेल टीपला, हर्षल पटेलनं सातत्य कायम राखताना SRHला तीन धक्के दिले. हैदराबादला ७ बाद १४१ धावांपर्यंतच मजल मारता आली.
विराट कोहलीनं पहिलाच चेंडू सीमापार टोलवून दणक्यात सुरुवात केली, परंतु भुवनेश्वर कुमारनं त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला पायचीत केलं. बढती मिळालेला ख्रिस्टिटन १ धाव करून सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. श्रीकर भरतनं ( १२) सुसाट षटकार खेचून सर्वांचे लक्ष वेधले खरे, परंतु त्यालाही ( १२) मोठी खेळी करता आली नाही. दरम्यान, देवदत्त पडिक्कल व ग्लेन मॅक्सवेल यांनी RCBचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना RCBची विजयाच्या दिशेनं वाटचाल करून दिली. पण, या दोघांचाही ताळमेळ चुकला. ग्लेन मॅक्सवेल ४० धावांवर ( २५ चेंडू, ३x४ व २x६) धावबाद झाला.
मॅक्सवेल बाद झाल्यानं धावा व चेंडू यांच्यातील अंतर वाढू लागले आणि देवदत्तवर दडपणही वाढले. त्याच ओझ्याखाली त्यानं राशिद खानला विकेट दिली. राशिदनं टाकलेला चेंडू देवदत्तनं ( ४१) डिप मिडविकेटच्या दिशेनं टोकावला, परंतु अब्दुल समदनं सुरेखरित्या तो टिपला. एबी डिव्हिलियर्स व शाहबाज अहमद यांनी RCBला विजय मिळवून देण्यासाठी जोरदार फटकेबाजी केली. १९व्या षटकात जेसन होल्डरच्या पहिल्याच चेंडूवर भुवनेश्वर कुमारनं शाहबाजचा झेल सोडला अन् तिथे सामना फिरला. पण, चौथ्या चेंडूवर होल्डरनं ही विकेट मिळवलीच.
आता RCBला अखेरच्या षटकात १३ धावा करायच्या होत्या आणि स्ट्राईकवर जॉर्ज गार्टन होता. भुवनेश्वर कुमारनं पहिल्या दोन चेंडूंत एकच धाव दिली. एबीन तिसरा चेंडू दूरवर खेचला, परंतु त्यावर धाव घेतली नाही. चौथा चेंडू थेट सीमापार टोलवून २ चेंडूंत ६ धावा असा सामना रंगतदार केला. पाचवा चेंडू निर्धाव गेला. अखेरच्या चेंडूवर एकच धाव मिळाल्यानं RCBला सामना ४ धावांनी गमवावा लागला.
Web Title: IPL 2021, RCB vs SRH Live Updates : Bhuvi defended 13 runs in the final overs, SRH has defended 141 runs against RCB
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.